मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे ३३ (९) अंतर्गत दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील इमारतींचा समुह पुनर्विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारची मिळालेली मान्यता आणि यासंबंधीचा जारी झालेला शासन निर्णय यामुळे आता पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने दुरूस्ती मंडळाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार सर्वप्रथम कामाठीपुऱ्यातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असून या कामाला शक्य तितक्या लवकर सुरुवात करण्याचा मंडळाचा मानस आहे.
हेही वाचा >>> दाभोलकर हत्येशी संबंधित खटला : सुनावणी दोन – तीन महिन्यांत पूर्ण होईल, सीबीआयची उच्च न्यायालयात माहिती
कामाठीपुरातील इमारती जुन्या झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे २७ एकर जागेवर वसलेल्या गल्ली क्रमांक १ ते १५ मधील इमारतींचा पुनर्विकास करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून होत होती. मात्र या इमारतींच्या पुनर्विकासाला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर राज्य सरकारने कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडावर सोपविली. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच कामाठीपुराच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला.
हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंता एसीबीच्या जाळ्यात; साडेआठ लाख रुपये लाच स्वीकारल्याचा आरोप
राज्य सरकारने कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाला मान्यता देतानाच या प्रकल्पाच्या नियोजनासाठी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची एक नियोजन समिती स्थापन केली. या समितीची पहिली बैठक लवकरच होणार असून सर्वप्रथम कामाठीपुऱ्याचे सर्वेक्षण करण्याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती दुरूस्ती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कामाठीपुऱ्यात नेमक्या किती इमारती आहेत, त्यात किती निवासी-अनिवासी गाळे आहेत, त्यात किती रहिवासी राहतात, उपकरप्राप्त इमारती किती आहे, इतर इमारती किती आहेत याबाबतची माहिती या सर्वेक्षणाअंतर्गत जमा करण्यात येणार आहे. रहिवाशांच्या मतदारयाद्यांसह इतर कागदपत्रांची पडताळणी दुरूस्ती मंडळ करणार आहे. रहिवाशांची पात्रता निश्चिती आणि प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार करणे सोपे जावे यादृष्टीने हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.