अन्य एका व्यक्तीलाही अटक
मुंबई : अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई न करण्यासाठी नऊ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंत्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> मुंबई : भर रस्त्यात तरुणीच्या मोबाईलची चोरी; सराईत आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे पश्चिम येथील ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयात मोहन रामू राठोड (४२) दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत आहेत. याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे चॅपल रोड येथे दोन मजल्यांचे घर आहे. महानगरपालिकेने तक्रारदाराच्या घराच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर निष्कासन कारवाई करण्याची नोटीस बजावली होती. त्यामुळे तक्रारदाराने वांद्रे येथील महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन राठोड यांची भेट घेतली. त्यावेळी राठोड यांनी १५ लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराची पैसे देण्याचे इच्छा नसल्यामुळे त्यांनी ६ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याप्रकरणी एसीबीने तपासणी केली असता राठोड यांनी नऊ लाख रुपयांची मागणी केली व तडजोडीअंती खासगी व्यक्तीमार्फत साडेआठ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार मंगळवारी एसीबीने सापळा रचून साडेआठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती मोहम्मद शोहेब मोहम्मद रझा खान याला पकडले. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.