मुंबई : एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न व पर्यायांचे भाषांतर करताना चूक झाल्याने विद्यार्थ्यांना २१ प्रश्नांना चुकीचे पर्याय देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना झालेला त्रास लक्षात घेऊन चुकीचे पर्याय आलेल्या विद्यार्थ्यांची पुढील आठवड्यात पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना लवकरच सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) सांगण्यात आले. त्यामुळे या परीक्षेला बसलेल्या २४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित म्हणजे पीसीएम या गटाच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या सत्रामध्ये गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत २० ते २५ प्रश्नांचे पर्याय चुकीचे आल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे ई-मेलद्वारे व प्रत्यक्ष जाऊन तक्रार केली होती. याची दखल घेत सीईटी कक्षाने परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका निश्चित केलेल्या तज्ज्ञांकडून त्यांची पुन्हा तपासणी केली. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे आढळून आले.
प्रश्न व पर्यायांचे इंग्रजीमध्ये भाषांतर करताना प्रश्नपत्रिका निश्चित करणाऱ्या तज्ज्ञांकडून चूक झाल्याने इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत २१ प्रश्नांचे पर्याय चुकले. मात्र मराठी व उर्दूच्या प्रश्नपत्रिकेत कोणतीही चूक झाली नसल्याचे सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.
इंग्रजीमधून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली असली, तरी मराठी व उर्दूमधून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे इंग्रजीमधून परीक्षा दिलेल्या २४ हजार ७४४ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. पुन्हा परीक्षा घेताना विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असून, परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मेसेज, ई-मेल, व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून कळविण्यात येणार असल्याचेही सीईटी कक्षाचे आयुक्त सरदेसाई यांनी सांगितले.
किती मुलांनी दिली होती परीक्षा
एमएचटी सीईटीच्या अखेरच्या सत्रासाठी ३१ हजार २० विद्यार्थ्यांची नोंद होती. त्यातील २७ हजार ८३७ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये २४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी इंग्रजीमधून, २ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी मराठीतून आणि २१८ विद्यार्थ्यांनी उर्दूतून परीक्षा दिली होती. परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचीच पुन्हा परीक्षा हाेणार असून, गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नसल्याचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले.