९० वर्षांच्या लेखिकेचे इंग्रजीशी ‘शेकहँड’; दिल्लीच्या ‘स्पीकिंग टायगर’कडून प्रकाशन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुर गायनाने आणि अभिनयकौशल्याने ऐंशी वर्षांपूर्वी गुजराथी-राजस्थानी रंगभूमी गाजविलेल्या वंदना मिश्र यांचे ‘मी..मिठाची बाहुली’ हे मराठी आत्मचरित्र आता इंग्रजीत आले आहे. ‘राजहंस प्रकाशन’तर्फे २०१४मध्ये प्रसिद्ध झालेल्या या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद विख्यात लेखक आणि अनुवादक जेरी िपटो यांनी केला असून दिल्लीच्या ‘स्पीकिंग टायगर’ने देखण्या स्वरूपात प्रसिद्ध केला आहे.

पक्क्या मुंबईकर असलेल्या मिश्र यांनी स्वातंत्र्य-पूर्व काळातल्या मुंबईचे आणि तत्कालीन समाजजीवनाचे मनोज्ञ दर्शन ‘मी..मिठाची बाहुली’त पानोपानी घडविले आहे. १९४४ साली मुंबई गोदीत झालेला स्फोट, ‘चले जाव’ची चळवळ, स्वातंत्र्याबरोबरच आलेली फाळणी, म. गांधींची हत्या या महत्त्वाच्या टप्प्यांचा हा दस्तावेज आहे. मिश्र यांची आणि मुंबईची कहाणी हातात हात घालून चालते हे पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. ‘मुंबईची जीवनमूल्ये, श्रम-संस्कृती आणि या शहराची सर्वसमावेशक, माणुसकीवर आधारलेली जीवनशैली या वैशिष्ट्यांचा वंदनाताईंनी वेध घेतला आहे. पुढची वाटचाल करत असताना एखाद्या शहराने, तिथल्या जनसमूहाने सिंहावलोकन करणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्याला नेमके कुठे जायचे आहे याचा बोध होतो, असे जेरी िपटो पुस्तकाच्या प्रास्ताविकात म्हणतात.

मिश्र यांनी गुर्जर-मारवाडम्ी रंगभूमीचा रसीला वृत्तांत पुस्तकात कथन केला आहे. इंग्रजी अनुवादाच्या निमित्ताने आता हा इतिहास अ-मराठी समाजाला ठाऊक होणार आहे. बालपणातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे कुटुंबाचा भार वंदना मिश्र यांनी स्वीकारला आणि वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मराठी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. वंदना मिश्र यांनी मामा वरेरकरांच्या ‘सारस्वत’ या, त्या काळातल्या गाजलेल्या प्रायोगिक नाटकात महत्त्वाची भूमिका केली आणि पाश्र्वनाथ आळतेकरांच्या ‘लिट्ल थिएटर’मध्ये अभिनयाचे धडे घेतले. पुढे, मुंबईच्या गुजराथी-राजस्थानी रंगभूमीवर त्यांना गायिका-अभिनेत्री म्हणून लक्षणीय यश मिळाले.

 

मी नव्वदीच्या उंबरठ्यावर उभी आहे. हे आवराआवर करण्याचे वय. या वयात माझे मराठी पुस्तक तर आलेच, शिवाय त्याचा इंग्रजी अनुवाददेखील प्रसिद्ध होत आहे. हा दुग्धशर्करा योग आहे.  महेश एलकुंचवार आणि शांता गोखले यांसारख्या नाणावलेल्या लेखकांनी माझ्या पुस्तकाची भलामण केली याचे मला समाधान आहे.

– वंदना मिश्र, लेखिका

लेखिका-समीक्षक शांता गोखले यांच्यामुळे या पुस्तकाची ओळख झाली. शांताबाईंनी इंग्रजी अनुवादाचा अखेरचा खर्डा वाचून मौलिक सूचना केल्या. तसेच, अनुवादाच्या निमित्ताने गायिका नीला भागवत यांच्याकडे पुन्हा एकदा मराठीचे धडे घेता आले.

– जेरी पिंटो, अनुवादक

 

 

 

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mi mithachi bahuli by vandana mishra
First published on: 17-04-2016 at 02:40 IST