इम्तियाज अली यांचा अमर सिंग चमकीला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. खरं तर हा चित्रपट पंजाबचे सिंग अमर सिंग यांचा चरित्रपट आहे. ज्यांना ‘एल्विस ऑफ पंजाब’ म्हटलं जातं. चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि परिणिती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. ८० च्या दशकात अमर सिंग चमकीला पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीचे सर्वाधिक प्रसिद्ध गायक होते. मृत्यूच्या ३६ वर्षांनंतरही चमकीला यांचे जीवन अन् तो काळ पुन्हा चर्चेत आला आहे. शुक्रवारी १२ एप्रिल रोजी इम्तियाज अली दिग्दर्शित चरित्रपट अमर सिंग चमकीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पंजाबच्या संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध पंजाबी गायकाच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला आहे.

खेडेगावातील जीवन, अंमली पदार्थांचे सेवन, बंदुका, विवाहबाह्य संबंध, हुंडाबळी, दारूबंदी आणि पंजाबी पुरुषत्वाच्या बाबींवर भाष्य करणाऱ्या गाण्यांसह चमकीला यांनी १९७९ ते १९८८ पर्यंत पंजाबमधील संगीत क्षेत्रावर राज्य केले. गुरदास मान किंवा सुरिंदर कौर, आशा सिंग मस्ताना यांच्यासारखी त्यांची गाणी साधी नव्हती. तर त्यांची ही गाणी ठणठणीत आणि बिनधास्त वाटायची. विशेष म्हणजे चमकीला यांचा आवाजही सुरेल होता. चमकीला यांनी लिहिलेल्या बहुतेक गाण्यांमध्ये बेधडक बोल असायचे. बऱ्याचदा ते काही लोकांना बावळट वाटायचे. अनेक निंदकांनी त्यांची निंदासुद्धा केली होती. परंतु तरीही ते बिनधास्त गाणी गायचे. त्यांना गाण्याचे अनेक अल्बम्स मिळाले, तसेच मिळालेल्या असंख्य लाइव्ह शोमुळे अनेक पिढ्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतील, असा त्यांना पौराणिक दर्जा मिळाला.

चमकीला यांचे बालपण आणि सुरुवातीचे आयुष्य

आता पंजाबच्या लुधियानामधील दुगरी गावात एका गरीब दलित कुटुंबात कर्तार कौर आणि हरी सिंग संदिला यांच्या घरी चमकीला यांचा जन्म झाला. सहा वर्षांचे असताना त्यांनी घरी थोडेसे गाण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच त्यांची गायक व्हायची इच्छा होती. ते १८ वर्षांचे होते आणि गुरमेल कौर नावाच्या महिलेशी त्यांनी लग्न केले. कौरपासून धनी राम (चमकीला)ला चार मुले झाली होती. त्यापैकी दोन मुलांचा बालपणीच मृत्यू झाला. दोन मुली अमनदीप आणि कमलदीप यादेखील पंजाबच्या लोकगायिका आहेत. कापड कारखान्यात काम करत असताना धनी राम (अमर सिंग चमकीला) यांचा संगीताकडे कल वाढू लागला. नोकरी करत असतानाच त्यांनी हार्मोनियम आणि ढोलकी वाजण्याची कला अवगत केली. याबरोबरच स्थानिक गायकांबरोबर बसून गायनाचेही धडे गिरवायला सुरुवात केली.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
banned films because of bold scenes
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
aishwarya narkar answer to netizen who troll avinash narkar dance
Video: अविनाश नारकरांचा नेटकऱ्यांना खटकला डान्स, ऐश्वर्या नारकर स्पष्टच म्हणाल्या, “तो…”

प्रसिद्ध कवी शिवकुमार बटालवी आणि फरीदकोटचे खासदार राहिलेले संगरूरचे मोहम्मद सादिक यांसारख्या स्थानिक संगीत कलाकारांच्या संगीत मैफलीत ते बसू लागले. संगीत शिकण्याच्या या प्रक्रियेदरम्यान चमकीला यांची भेट सुरिंदर शिंदा यांच्याशी झाली. सुरिंदर शिंदा तत्कालीन पंजाबी लोकगायक म्हणून प्रसिद्ध होते. चमकीला यांनी त्यांचे शिष्य होऊन त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. शिंदा यांच्यासाठी चमकीला यांनी अनेक गाणी लिहिली, त्यांच्या गायक संघातही ते सामील झाले. पण या कामातून त्यांना महिन्याकाठी केवळ १०० रुपये मिळत होते, जे कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी अपुरे होते. शेवटी धनी राम यांनी चमकीला या नावाने स्वतः गाणी गाण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून कुटुंबासाठी पुरेसे पैसे मिळवता येतील.

चमकीला ताऱ्याचा असा झाला उदय

हळूहळू चमकीला यांनी तमाम पंजाबी गायकांना मागे टाकले. लोकांना त्यांच्या गाण्याचे अक्षरश: वेड लागायला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील जीवन, अमली पदार्थांचे व्यसन, बंदुका, विवाहबाह्य संबंध, हुंडा, व्यसन आणि पंजाबमधील मनगटशाही या विषयांवर चमकीला यांनी गाणी तयार केली होती. चमकीला यांची गाणी विद्रोही होती. गाण्यांचे लेखनही चमकीला स्वतः करायचे. बऱ्याचदा त्याच्या गाण्यात लैंगिक द्विअर्थ असायचा. चमकीला यांच्यामुळे पंजाबच्या इतर लोकप्रिय गायकांना घरी बसावे लागले, असे म्हटले जाते. चमकीला यांना पंजाबचा बेस्ट लाइव्ह स्टेज परफॉर्मर मानलं जातं. चमकीला यांच्यासारखा परफॉर्मर पंजाबमध्ये आजपर्यंत जन्माला आलेला नाही, असंही बोललं जातं. ‘पहले ललकारे नाल’, ‘बाबा तेरा ननकाना’, ‘तलवार मैं कलगीधर दी’ ही अमर सिंग चमकीला यांची लोकप्रिय गाणी आहेत. त्यांनी ‘जट दी दुश्मनी’ हे सुपरहिट गाणं लिहिलं आहे. ‘ताकुए ते तकुआ’ या गाण्यामुळे अमर सिंग चमकीला चांगलेच लोकप्रिय झाले. गायक सुरिंदर सोनियांबरोबर त्यांनी आठ गाण्यांचा पहिला अल्बम आणला. परंतु सोनिया यांचा मॅनेजर त्यांना योग्य पगार देत नसल्याचं त्यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी गायिका उषा किरणबरोबर काही काळ काम केले. तिच्याशी त्यांनी कालांतराने लग्न केले. तसेच त्यांनी यापूर्वी लोकप्रिय गायक कुलदीप माणक यांच्याबरोबरही काम केले होते. उषा आणि अमर सिंग यांची जोडी खूप गाजली. त्यांनी मोठ्या पडद्यावरही काम केले. दोघांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यांचं गाण ऐकण्यासाठी लोक मैदान आणि इमारतीच्या गच्चीवरही गर्दी करायचे. कुटुंबात लग्न ठरवण्यासाठी चमकीला यांच्या परफॉर्मन्ससाठी तारखाही घेतल्या जायच्या. जेव्हा स्थानिक गायक ५०० रुपये मानधन घ्यायचे तेव्हा चमकीला हे ४ हजार रुपये मानधन घ्यायचे. एका वर्षात त्यांनी ३६५ हून अधिक कार्यक्रम केले. कधी कधी एकाच दिवशी दोन गावात त्यांचे कार्यक्रम असायचे. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांसाठी रेकॉर्डिंग केले. तसेच कार्यक्रमांनिमित्ताने त्यांनी कॅनडा आणि दुबईमध्येही प्रवास केला. अमरज्योत आणि चमकीला यांना मुलगा होता, त्याचे नाव जयमन होते.

चमकीला यांच्या संगीताची पार्श्वभूमी खरं तर पंजाबच्या बंडखोरीतून निर्माण झाली होती, ज्यांनी १९८४ च्या शीख दंगलीनंतर जोर पकडला होता. शीख फुटीरतावादी चळवळ आणि खलिस्तानच्या स्थापनेच्या आवाहनांना दहशतवाद, हत्या, बॉम्बफेक, पोलिसांची क्रूरता आणि अनेक मानवी हक्कांचे उल्लंघनांवर त्यांनी गाण्यातून बोट ठेवले होते. चमकिला यांच्या गाण्यांमध्ये लैंगिक द्विअर्थ असल्यामुळे दहशतवादी संघटनांकडून त्यांना अनेकदा धमक्या मिळत असत. पत्राच्या माध्यमातून ठार करण्याची धमकी मिळाल्यानंतर चमकिला काही दिवस मित्रांच्या घरी भूमिगत होत असत. काही दिवसांसाठी गाणी लिहिणेही थांबविले जायचे. पण जास्त काळ भूमिगत राहणे चमकिला यांना जमायचे नाही, ते दोघेही पुन्हा कामाला सुरुवात करायचे. खलिस्तानी समर्थकांकडून अमर सिंग चमकीला यांना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या.

चमकीला यांचा मृत्यू अन् षडयंत्र

८ मार्च १९८८ ला अमर सिंग, अमरज्योत आणि बँडमधील सदस्य पंजाबच्या मेहसामपूरमध्ये परफॉर्म करण्यासाठी आले होते. दुपारी दोन वाजता ते आपल्या गाडीतून खाली उतरले, तितक्यात बाईकस्वारांच्या टोळीने त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी अमरज्योत गरोदर होत्या. छातीत गोळी लागून त्या बाळासह गतप्राण झाल्या. तर चार गोळ्या लागल्याने अमर सिंग चमकीला यांचाही मृत्यू झाला होता. त्यांचे साथीदार गील सुरजीत आणि ढोलकी वादक राजा यांनाही हल्ल्यात प्राण गमवावे लागले होते. मृत्यू झाला त्यावेळी अमर सिंग यांनी लिहिलेली जवळपास २०० गाणी स्वरबद्ध होणे बाकी होते. ही हत्या दहशतवाद्यांनी घडवून आणल्याची चर्चा होती. अमर सिंग चमकिला यांच्या वाढत्या प्रभावामुळे काही सहगायकांनी त्यांच्या हत्येचा कट रचला, असा काही जणांचा आरोप होता. त्यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलींवर नियंत्रण मिळवण्यासाठी संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. क्रांतिकारी लेखनाबरोबर त्यांनी परजातीतील तरुणीशी केलेला विवाह हेसुद्धा विरोधकांच्या डोळ्यात खुपण्याचं एक कारण होतं. त्यांची पत्नी अमरज्योत कौर ही चमकीला यांच्यापेक्षा वरच्या मानल्या जाणाऱ्या जातीतील असल्याचं सांगितलं जातं. लग्नानंतर अमरज्योत ही त्याच्याच बँडमध्ये त्याच्याबरोबर परफॉर्म करायची. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी हे हत्याकांड घडवल्याचा अंदाजही वर्तवला गेला होता. चमकीला यांच्या आयुष्यावर २०१८ साली ‘मेहसामपूर’ हा चित्रपट आला होता. तर दोसांज आणि निर्लम खैरा अभिनीत ‘जोडी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. २०१४ साली लेखक गुलझार सिंग यांनी चमकीला यांच्या आयुष्यावर ‘आवाज मरदी नही’ हे पुस्तक प्रकाशित केले. या हत्या प्रकरणात कधीच कोणाला अटक झाली नाही आणि इतक्या वर्षांनंतरही हे प्रकरण म्हणजे न उलगडलेले कोडं आहे. चौघांच्या हत्येचं कारणही एक गूढच बनून राहिलं आहे.