मुंबई : बेस्ट उपक्रमाने बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी दाखल केलेल्या छोटय़ा आकाराच्या मिडी बसमुळे प्रत्यक्षात बेस्टची प्रवासी संख्या वाढलेली नाही. त्यामुळे मिडी बसऐवजी यापुढे मोठय़ा आकाराच्या बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. भाडेतत्त्वावरील तीन हजार वातानुकूलित मोठय़ा आकाराच्या बस २०२३ च्या अखेपर्यंत टप्प्याटप्प्यात दाखल केल्या जाणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांत कमी झालेली प्रवासी संख्या, उत्पन्न, दैनंदिन वाढणारा खर्च इत्यादी कारणांमुळे बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग तोटय़ात गेला आहे. त्यामुळे स्वमालकीच्या बस खरेदी करण्यापेक्षा भाडेतत्त्वावरील बस घेण्यावर उपक्रमाने गेल्या चार ते पाच वर्षांत भर दिला. त्यातच करोनामुळे प्रवासी आणि उत्पन्नावर परिणाम झाला. आता ही गाडी काहीशी पूर्वपदावर आली. मात्र तरीही उपक्रम त्यात समाधानी नसल्याचे समोर आले आहे.
उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ३,६३८ बसगाडय़ा असून यात एकमजली मोठय़ा आकाराच्या आणि लहान आकाराच्या मिडी बस आहेत. त्यातही काही बस वातानुकूलित आणि काही बस विनावातानुकूलित आहेत. यामध्ये भाडेतत्त्वावरील बसही आहेत. बेस्टचे उत्पन्न वाढावे, बसच्या फेऱ्या वाढाव्या यासाठी वाहतूक कोंडीतून मार्ग काढणाऱ्या मिडी बस टप्प्याटप्प्यात ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला. त्यानुसार सध्या १,७०० हून अधिक मिनी, मिडी बस ताफ्यात असून उर्वरित बस या एकमजली, तसेच ४५ दुमजली (डबल डेकर) बस आहेत; परंतु मिडी बसमुळे बेस्टच्या वाढत्या प्रवासी संख्येवर मर्यादा आल्या आहेत. मिडी बसची प्रवासी क्षमता असल्याने बसमध्ये गर्दी होते आणि प्रवाशांना नाइलाजाने उभ्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेक प्रवासी मोठय़ा आकाराच्या बसची प्रतीक्षा करतात अन्यथा रिक्षा, टॅक्सीचा पर्याय निवडतात.
जास्तीत जास्त मिडी बस दाखल करून त्या चालवल्याने प्रवासी संख्या वाढू शकलेली नाही. मे महिना व अन्य सुट्टय़ांमुळेही प्रवासी संख्या वाढलेली नाही. सध्या एकूण ३,६३८ बसपैकी १,७०० हून अधिक बस या मिडी, मिनी आहेत. त्यामुळे येत्या दीड वर्षांत फक्त मोठय़ा आकाराच्या तीन हजार वातानुकूलित बसच ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बस भाडेतत्त्वावर असतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. या बस तीन कंपन्यांकडून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोठय़ा आकाराच्या बसमध्ये ९०० दुमजली बस असतील, असेही त्यांनी सांगितले.
मिडी बसमुळे कमी प्रवासी
बेस्टची प्रवासी संख्या मध्यंतरी ३१ लाखांपर्यंतही पोहोचली. मे महिन्यात २७ लाखांपर्यंत होती. आता २९ लाख प्रवासी संख्या आहे; परंतु त्यात वाढ होऊ शकली नाही. साधारण ४० लाख प्रवासी येत्या काही महिन्यांत प्रवास करतील, अशी आशा बेस्टला होती; परंतु मिडी बसमुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे.

बेस्टचा एकूण ताफा- ३ हजार ६३८
वातानुकूलित बस- १,४४०
विना वातानुकूलित बस- २,१९८
एकूण मिडी बस- १,२०६
एकूण मिनी बस- ५५७
मोठय़ा आकाराच्या बस- १,८७५
एकूण बसमध्ये भाडेताफ्यावरील बस- १,७७५