केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा फटका ठाणेकरांना बसण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्हा आणि मुंबईतील काही भागांमध्ये दुध वितरण करणा-या मोठ्या वितरकांनी पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उद्या या भागामध्ये दुध विक्री बंद राहण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे देशभरातील व्यवहार मंदावले आहेत. मोठ्या वितरकाकडून दुध खरेदीकरुन छोटे वितरक ते दुकानापर्यंत पोहोचवतात आणि यानंतर ते दुध घरोघरी पोहोचवले जाते. पण केंद्र सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्याने मोठ्या वितरकांनीही या नोटा स्वीकारण्यास बंद केले आहे. यापुढे नवीन नोटाच स्वीकारु असा पवित्रा मोठ्या वितरकांनी घेतला आहे. मात्र सद्यस्थितीत नवीन नोटा आणायच्या कुठून असा प्रश्न छोट्या वितरकांनी उपस्थित केला आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुसंख्य भागात महिनाभराचे दुधाचे बिल एकत्रच भरले जाते. अशा स्थितीत लोक पाचशे आणि हजारच्या नोटाच देतात. बाजारात सध्या नवीन नोटांचे प्रमाणच कमी आहे, मग आम्ही या नोटा कुठून आणायचा, असा प्रश्न एका किरकोळ दुधविक्रेत्याने उपस्थित केला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात दुध वितरकांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. मात्र या वादावर तोडगा निघाला नाही तर उद्या ठाणे जिल्ह्यात दुध मिळण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.