मुंबई – ग्रामीण महिलांनी चूल आणि मुल याच्या बाहेर पडून मी स्वतः काम करुन कमवू शकते हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण केला पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांना सगळ्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी चांगल्या बाजारपेठ उपलब्ध करुन दिली पाहिजे. प्रामाणिक आणि जिद्दीने काम करणाऱ्यांना कोणतीही कमतरता आम्ही भासू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिले.

उमेद अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस २०२३-२४ प्रदर्शनात महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानचे (एमएसआरएलएम) संचालक रूचेश जयवंशी, परमेश्वर राऊत, रेमंड डिसोझा तसेच एमएसआरएलएमचे अन्य अधिकारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> मुंबई : भाऊचा धक्का येथे मच्छीमार नौकेत गुदमरून दोघांचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर, तिघे स्थिर

‘महालक्ष्मी सरस’ या ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन हे ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांचे आर्थिक भान वाढवण्यासाठी सुरू करण्यात आले. पहिल्या वर्षी या प्रदर्शनातून ५० लाख रुपयांचा व्यवसाय या ग्रामीण महिलांनी केला होता. मागील वर्षी १७ कोटींचा व्यापार झाला असून यावर्षी १४ दिवसात २५ कोटींचा व्यापार होईल, असेही महायन यांनी यावेळी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीकेसी येथील एमएमआरडीए मैदान येथे ७ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन आहे. यंदा देशभरातून ५०० हून अधिक व्यावसायिक सहभागी झाले आहेत. त्यात ५० कक्ष नाबार्डचे आहेत. या प्रदर्शनात हस्तकलेच्या वस्तू, भरतकाम केलेले कपडे, बनारसी साड्या, पैठणी, पश्मिना शाली, ज्युटच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, लाकडी वस्तू, कृत्रिम दागिने, बॅग, बुट, ड्रेस मटेरीयल, बेडशीट, कारपेट, पडदे तसेच घरगुती मसाले, पापड, खाद्य पदार्थांची दुकाने आहेत.