मुंबई : माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेत भ्रमणध्वनीवर पत्ते खेळतानाची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करून खळबळ उडवून देणाऱ्या आमदार रोहित पवार यांना कोकाटे यांनी मानहानीची नोटीस बजावली आहे. त्यावर सारे न्यायालयात सिद्ध करीन, असे प्रतिआव्हान रोहित पवार यांनी दिले आहे.
रोहित पवार यांनी याबाबत समाज माध्यमावर एक संदेश प्रसारित केला आहे. माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात पत्ते खेळतानाची चित्रफीत जगजाहीर केली म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आली आहे. तुमचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, त्यामुळे वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती, तर पत्ते खेळलाच कशाला. शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.
तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात, हे मी पुराव्यांसह सिद्ध केले होते आणि न्यायालयातही पुराव्यांसह सिद्ध करून दाखवीन, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. दरम्यान, कोकाटे यांची पत्ते खेळतानाची चित्रफीत प्रसारित झाल्यामुळे आणि सरकारवर चौफर टिका होऊ लागल्यामुळे कृषिमंत्री पदावरून त्यांना हटवून कमी महत्त्वाचे क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्याक मंत्रिपदाचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
‘रमी खेळत असल्याचे सिद्ध झाल्यास राजकारणातून निवृत्ती’ मला रमी खेळता येत नाही. रमी खेळण्यासाठी संबंधित रमीच्या अॅपशी बँक खात्यासह अनेक बाबींची जोडणी करावी लागते. यापैकी मी काहीही केलेले नाही. रोहित पवारांनी मी रमी खेळत असल्याचे न्यायालयात सिद्ध केल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन. त्यांनी सभागृहाच्या अधिकाराचे आणि माझ्या खासगी अधिकाराचे उल्लंघन करून संबंधित चित्रफीत प्रसारित केली आहे. त्यामुळे मानहानीची नोटीस मागे घेणार नाही. या प्रकरणी त्यांनी माफी मागितली तरच नोटीस मागे घेईन, अन्यथा न्यायालय जो निर्णय देईल, तो मान्य असेल, असे कोकाटे यांनी म्हटले आहे.