अ‍ॅण्टॉप हिल येथे ९ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आता गोवंडीतही एका १३ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या झाली आहे. ही मुलगी शनिवारी रात्री घराजवळून बेपत्ता झाली होती. रविवारी पहाटे तिचा मृतदेह एका कचराकुंडीत आढळून आला. ती बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेच हालचाल केली असती तर कदाचित तिचे प्राण वाचले असते, असा स्थानिकांनी आरोप केला आहे.
मीना (नाव बदललेले) गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात राहते. मुलीचे कुटुंबीय मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवतात. आजुबाजूला शोध घेतल्यानंतर तिच्या पालकांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिच्या कुटुंबियांनी रात्रभर तिचा शोध सुरू ठेवला होता.
दरम्यान, एका नागरिकाला रविवारी पहाटे बैंगणवाडी रोड क्रमांक १० जवळील मैदानाच्या कोपऱ्यात असणाऱ्या कचराकुंडीत चटईमध्ये लपवलेल्या अवस्थेत एका मुलीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या मीनाचाच असल्याचे निष्पन्न झाले.  हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. परिसरातील संशयितांची धरपकड सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्ह्यांची मालिका सुरूच
गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरू झाली आहे. दिंडोशी येथे शिवसेनागटप्रमुखाची घरात घुसून हत्या करण्यात आली. पाठोपाठ अंधेरी येथे दिवाळी पार्टी सुरू असताना धैर्यशिल देसाई याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अ‍ॅन्टॉप हिल येथे शुक्रवारी रात्री ९ वर्षीय मुलीचे अपहरण करुन बलात्कार  करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl raped and killed in govandi
First published on: 27-10-2014 at 02:52 IST