विधानसभेतील स्पष्ट बहुमतासाठी काही आमदार कमी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. सत्तेत सहभागी होण्याची शिवसेनेची आस अजूनही कायम असून बुधवारी सकाळपर्यंत भाजपच्या प्रस्तावाची वाट पाहण्याचे सेनेने ठरवले आहे. मात्र, शिवसेनेने विरोधी पक्षांत बसण्याचा निर्णय घेतला तरी, अपक्ष आणि मित्रपक्षांचे बळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठिंब्याचे आश्वासन यांच्या जोरावर बहुमत सिद्ध करण्याचा भाजपला विश्वास आहे.
मंत्रिपदे आणि खात्यांबाबत भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल केला आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारीही शिवसेना विरोधी पक्षाच्या आवेशात सरकारविरोधात आक्रमक राहिली. मात्र, मंगळवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर, बुधवारी सकाळपर्यंत भाजपच्या प्रस्तावाची वाट पाहण्याचे शिवसेनेने जाहीर केले. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या क्षणापर्यंत शिवसेनेकडून याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला तरी, भाजपला विश्वासदर्शक ठराव जिंकणे फारसे कठीण नाही. भाजपकडे १२२ सदस्य असून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन, सात अपक्ष आणि शेकापसह काही सदस्यांचा पाठिंबा गृहीत धरता सरकारला किमान १४० सदस्यांचा पाठिंबा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्याशिवाय राष्ट्रवादीनेही सरकार ‘पडू न देण्याचे’ आश्वासन दिले आहे.

सेनेचे ओझे नकोच!
मंत्रिमंडळात एकतृतीयांश सहभाग व काही महत्वाची खाती मिळावीत, असा शिवसेनेचा आग्रह आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याबरोबरच दिल्लीतील नेत्यांबरोबर शिवसेनेच्या नेत्यांची बोलणी सुरु आहेत. पण शिवसेनेच्या अटीपुढे झुकू नये, अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. ज्या कारणासाठी युती संपविली, त्याच कारणाचे ओझे पुन्हा शिरावर कशाला घ्यायचे, असाही एक सूर भाजपमध्ये आहे.
 
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अटळ
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे हरिभाऊ बागडे यांनी अर्ज दाखल केला असून शिवसेना आणि काँग्रेसनेही उमेदवार दिल्याने तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेचे विजय औटी यांनी अर्ज भरला असून काँग्रेसच्या वर्षां गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. मतदान टाळून अध्यक्षांची बिनविरोध निवडणूक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केल्याने निवडणूक अटळ असल्याचे मानले जात आहे.