सुधारित विकास आराखडय़ाच्या मसुद्यात २०० चुका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईचा २०१४-३४ च्या सुधारित विकास आराखडय़ाच्या मसुद्यामध्ये आरक्षण संकेतांक, वेगवेगळ्या आरक्षणांचे रंग, रस्त्यांच्या रुंदीची मापे, जलस्रोतांना दिलेला रंग, परिमंडळांच्या सीमा, सोडण्यात येणाऱ्या मोकळ्या जागा (बफरझोन), परवडणाऱ्या घरांचा संकेतांक आदींबाबत तब्बल २०० चुका असल्याचे पालिकेच्याच निदर्शनास आले असून या चुका तात्काळ सुधारण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा विकास आराखडय़ाची उजळणी करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईचा २०१४-३४ या कालावधीतील सुधारित विकास आराखडय़ाचा मसुदा पालिकेने तयार केला असून यावर सध्या नागरिक, संस्था आदींकडून सूचना आणि हरकती स्वीकारण्यात येत आहेत. येत्या २९ जुलैपर्यंत त्या स्वीकारण्यात येणार असून त्यानंतर त्याची पडताळणी आणि सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी यापूर्वी पालिकेने तयार केलेल्या विकास आराखडय़ाच्या मसुद्यामध्ये तब्बल ७० हजार चूका आढळल्या होत्या. त्यामुळे त्यात सुधारणा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता सरकारला सादर करण्यापूर्वी सुधारित आराखडय़ाच्या मसुद्याची पुन्हा उजळणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यावेळी आराखडय़ाच्या मसुद्यात २०० चुका आढळल्या आहेत.

आराखडय़ात दर्शविण्यात आलेल्या पुनर्वसन आणि पुनस्र्थापना, परवडणारी घरे, मैदाने, उद्याने आदींबाबतच्या काही आरक्षणांचा संकेतांक आणि त्यांच्या रंगामध्ये चुका झाल्या होत्या. काही आरक्षणे वेगळ्याच रंगाने दर्शविण्यात आली होती. रेल्वे मार्ग, महामार्ग, नदी, नाल्याकाठी अथवा अन्य ठिकाणी आवश्यकतेनुसार सोडण्यात येणारी जागा मसुद्यातील नकाशात दर्शविण्याचे राहून गेले होते. जुन्या आराखडय़ातील काही रस्त्यांची नावे आणि ठिकाणे सुधारित आराखडय़ाच्या मसुद्यात दर्शविण्याचे राहून गेले होते. काही ठिकाणच्या रस्त्यांच्या रुंदीची मापे चुकली होती. तसेच काही ठिकाणची जलस्रोते भलताच रंगाने दर्शविली होती. अशा प्रकारच्या तब्बल २०० चुका पालिकेलाच आराखडय़ात आढळून आल्या आहेत.

 चुका नेमका कशा?

वडाळा येथील अब्दुल गफारखान मार्ग सुधारित विकास आराखडय़ात दाखवायचा राहून गेला होता. पूर्वीच्या आराखडय़ात रस्त्यांचे विस्तारिकरण दाखविण्यात आले होते. परंतु सुधारित आराखडय़ाच्या मसुद्यात या रेषा अस्पष्ट झाल्याने त्यांचा अर्थच बदलून गेला. काही रेषा अनावश्यक पडल्या आहेत, असे पालिका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mistakes in mumbai development plan
First published on: 28-07-2016 at 04:07 IST