शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक झाले असून राजभवनावर मोर्चा आयोजित केला आहे. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. मात्र राजभवनावर पोहोचण्याआधीच नरिमन पॉईंट येथे हा मोर्चा अडवण्यात आला असून बच्चू कडू यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे व्हावेत तसंच शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात यावी अशा काही मुख्य मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी पोलिसांनी बच्चू कडू यांना मोर्चा आयोजित करण्यासाठीची परवानगी नाकारली होती. यानंतरही बच्चू कडू यांनी आपण मोर्चा काढणारच असल्याचं सांगितलं होतं. यामुळे पोलिसांनी नरिमन पॉईंट येथेच बच्चू कडू यांचा समर्थकांसबोतचा मोर्चा अडवला आणि ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. तसंच आंदोलकांनी पोलिसांची गाडीच अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बच्चू कडू यांच्या मोर्चाला परवानगी देण्यास नकार दिला होता. यासंबंधी बच्चू कडू यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. यानंतर नाराजी व्यक्त करत बच्चू कडू यांनी आपण पुढच्या वेळी आंदोलन करताना काहीही न सांगता थेट पोहोचू असा इशाराच दिला. सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणार नाही का ? असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी अटकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली असून त्यांनी आधीच माहिती दिली होती असं सांगितलं आहे. राज्यपालांकडे काही हक्कच नसतील तर त्यांनी सुत्रं हातात कशाला घ्यायची ? त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाही का ? राज्यपालांनी फक्त राजभवनात बसून राहायचं का ? ते काय स्वर्गातून आले आहेत का ? त्यांना राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहणं गरजेचं आहे असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bachchu kadu detained by police maharashtra farmers sgy
First published on: 14-11-2019 at 12:38 IST