राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात अथवा बैठकीभोवती वलय असेल, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असतील याची आवर्जून काळजी घेतली जाते. मात्र शुक्रवारी दादर येथे होणाऱ्या मुंबई व ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या शिबिराविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मनसेचे पानिपत आणि पक्षाला लागलेल्या गळतीच्या पाश्र्वभूमीवर राज यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात दिवसभरात कोणते कार्यक्रम होणार आहेत याची अस्पष्टही कल्पना पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली नाही. शिबिरासाठी शाखाध्यक्षापासून वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे रवींद्र नाटय़मंदिर येथे सकाळी दहा ते सायंकाळी चापर्यंत चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात भाजप व शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मनसे आक्रमकपणे शासनाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवून आपले गमावलेले स्थान पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करील, अशी अपेक्षा असताना अद्यापि मनसेचे नेते शांत बसून आहेत. निवडणुकीच्या काळात दिलेली टोलमुक्ती व अन्य अनेक आश्वासने अद्यापही टांगणीवरच असताना अनेक मंत्र्यांचा नवीन वेगवेगळ्या घोषणांचा धडाका सुरू आहे. टोलचे भूत दूर ठेवण्यासाठी आणखी एक समिती नेमून सरकार गप्प बसले आहे तर मुंबई महापालिकेत बेस्ट दरवाढ, मालमत्ता करवाढ, मेट्रो भाडेवाढ आदी अनेक प्रश्न असताना मनसे मात्र थंड बसून आहे. भाजपच्या दृष्टीने मुंबई महापालिकेतील सेनेची सत्ता घालवून भाजपची सत्ता स्थापन करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सेना-भाजप हे स्वतंत्रपणे लढणार हे स्पष्ट दिसत असताना आक्रमकपणे या साऱ्याविरोधात आवाज उठविण्याऐवजी ‘केजीबी’ची बैठक असावी अशा प्रकारे ‘गुप्त’ शिबीर का घेण्यात येत आहे, असा सवाल मनसेचेच पदाधिकारी एकमेकांना विचारत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला स्वतंत्र ओळखपत्र देण्यात आले असून प्रत्येक ओळखपत्राला बारकोड देण्यात आला आहे. शिबिरातील कार्यक्रमाची माहिती गुप्त ठेवण्यात आली असून पदाधिकाऱ्यांनी सभागृहात मोबाइल आणू नये, अशा स्पष्ट सूचना ओळखपत्रावरच लिहिण्यात आलेल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns arranged secret study camp today
First published on: 30-01-2015 at 02:57 IST