पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची रणनिती

राज्यातील दहा महापालिका निवडणुकींच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शहरांचा विकास आराखडा (ब्लू प्रिट) लोकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल येथे पक्षाच्या  साडेतीनशे पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात ‘ब्लू प्रिंट’ लोकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच छोटे छोटे कार्यक्रम घेण्यावर भर देण्यात आला.

मुंबईसह राज्यातील शहरांचे नियोजन कसे असावे तसेच त्यातील सौंदर्यीकरणासह नागरी सेवा प्रभावीपणे उपलब्ध कशा प्रकारे होतील, यावर मनसेने ‘ब्लू पिंट्र’ तयार केली होती.  गेल्या महापालिका निवडणुकीतराज यांनी केलेल्या जोरदार प्रचाराचा फायदा होऊन मुंबईत २८ नगरसेवक निवडून आले तर नाशिक महापालिकेची सत्ता मनसेला मिळाली होती. आता एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर श्रेयासाठी वादा रंगला असताना मनसेने विकासाचा आराखडा पुन्हा बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांनी त्याचे सादरीकरण केले. पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत नेण्यासाठी छोटय़ा कार्यक्रमांचे आयोजन प्रभावीपणे करण्याची भूमिकाही नितीन सरदेसाई यांनी मांडली. पक्षबांधणी भक्कम करण्यावर भर देतानाच  नागरी सेवांच्या मुद्दय़ावर शिबिरात प्रामुख्याने भर देण्यात आला. उद्या मनसेचे नेते बाळा नांदगावकर व अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.