आगामी लोकसभा निवडणूक केवळ महायुती म्हणूनच लढविण्यात येणार असून यात मनसेला कोणतेही स्थान असणार नाही, असे शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तर आमच्याकडून आता मनसेशी कोणताही संपर्क साधला जाणार नाही, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी तसेच वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झाल्याचेही या नेत्याने सांगितले.
काँग्रेस- राष्ट्रवादीविरोधात मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेला महायुतीत सामावून घेण्यासाठी भाजपने अगदी आता आतापर्यंत पुढाकार घेतला होता. मात्र मनसेकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याची भूमिका महायुतीने घेतली आहे.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यापासून त्यांनी देशव्यापी सभा घेतल्या असून कोणत्याही राज्यातील अन्य पक्षांबरोबर संवाद न साधता केवळ भाजपचीच ताकद वाढविण्यावर त्यांनी भर दिला आहे. महाराष्ट्रात मनसेला गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते लक्षात घेऊन तसेच भाजपच्या पडलेल्या जागांची गणिते मांडत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी ‘मनसेगीत’ गाण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्याच सुरात सूर मिळवून भाजपनेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीगाठीही घेतल्या. नितीन गडकरी ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत साऱ्यांनीच ‘कृष्णभुवन’वर पायधूळ झाडली. तथापि राज यांच्या मनात नेमके काय आहे, याचे कोडे त्यांना उलगडू शकले नाही.
शिवसेनेच्या ‘टाळी’ला राज यांनी ‘टाटा’ केल्यापासून सेनानेत्यांनी या विषयावर मिठाची गुळणी घरणेच पसंत केले होते. मात्र नरेंद्र मोदी यांनी भाजपचे नेतृत्व हाती घेतल्यापासून गेल्या दोन महिन्यात भाजप नेत्यांनीही राज यांच्याशी संपर्क ठेवलेला नाही, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मनसे हा विषय आमच्यासाठी संपलेला असून महायुती म्हणूनच लोकसभा निवडणूक लढवली जाईल, असे शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले.
महायुतीत भाजप २६ व शिवसेना २२ जागा लढणार असल्याचे निश्चित झाले असून रिपाइंला यात सामावून घेतले जाईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महायुतीसंर्भात सेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे सांगून आता महायुतीत नव्याने कोणाला स्थान मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही राऊत म्हणाले. मोदींच्या सभेनंतर भाजप नेत्यांचा ही आत्मविश्वास वाढला असून यापुढे आम्ही राज यांच्या दारी जाणार नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे.