महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) यंदाचा शिवाजी पार्कवर होऊ घातलेला गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर राजकीय व्यासपीठ म्हणून गुढीपाडव्याचे औचित्य साधून मनसेने गेल्यावर्षी पहिल्यांदाच या मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, आता दुसऱ्याच वर्षी हा मेळावा रद्द करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये मनसेला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. याशिवाय, दरम्यानच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मनसेच्या राजकीय अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे पक्षाच्या वाटचालीचा नवी दिशा ठरवतील, अशी अपेक्षा होती. मात्र,  काल ‘कृष्णकुंज’वर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी यंदाचा गुढीपाडवा मेळावा होणार नसल्याची माहिती दिली. राज ठाकरे व्यक्तिगत कारणासाठी परदेशात जात असल्याने त्यांना यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होता येणार नाही. राज ठाकरे हेच मनसेचा हुकमी एक्का असल्याने तेच नसतील तर हा मेळावा घेण्यात फारसा अर्थ नाही याची पक्षाला जाणीव आहे. परिणामी मनसेला हा मेळावा रद्द करावा लागला आहे. मात्र, पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर गुढीपाडवा जल्लोषात साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, गेल्यावर्षी मनसेने शिवाजी पार्कमध्ये पहिल्यांदा गुढीपाडवा मेळावा आयोजित केला होता. शांतता क्षेत्र असूनही भाजप सरकारने मनसेला शिवाजी पार्कात हा मेळावा आयोजित करण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यावेळी न्यायालयाने नेमून दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले होते. यावेळी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढही पाहायला मिळाली होती. गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या दसरा मेळाव्या इतके वातावरण तयार करण्यासाठी मनसेने सेना भवन, शिवाजी पार्क परिसर, दादरमधील काही भागात मोठ-मोठे झेंडे उभारले होते. त्यामुळे, शिवसेनेनेही मनसेच्या झेंडय़ांच्या गर्दीत मोठ-मोठाले झेंडे लावण्यात कोणतीही कसूर केली नसल्याने दोन्ही पक्षांच्या झेंडय़ांमुळे त्यांच्यातील स्पर्धा उघडपणे दिसून येत होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns guidpadawa melava shivaji park raj thackeray
First published on: 21-03-2017 at 07:45 IST