“भाजपाची लोकं डोक्यावर पडली आहेत का?, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला?”; मनसेची टीका

या लोकार्पण सोहळ्याला भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते

मनसेची टीका
राज्यातील विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाचा दिल्याचा आरोप करत मनसेने भाजपावर टीका केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्विटवरुन नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाची लोकं डोक्यावर पडली आहेत का असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपाचे मुंबईतील आमदार प्रसाद लाड यांनी चार मार्च रोजी रात्री १० वाजून ११ मिनिटांनी एक ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी एका उद्घाटन सोहळ्याची माहिती दिली होती. आपल्या मतदारसंघामध्ये लाड यांनी एक बहुउद्देशीय केंद्राचा आणि अद्ययावत शौचालयाचे उद्घाटन केल्याचे त्यांनी सांगितलं होतं. मात्र या शौचालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भाजपाने दिल्याचा आरोप करत मनसेने भाजपावर टीका केली आहे.

मनसेची टीका

संदीप देशपांडे यांनी या ट्विटचा समाचार घेत ते कोट करुन रिट्विट केलं. “ही लोक डोक्यावर पडली आहेत का ?छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला?,” असा टोला देशपांडे यांनी आपल्या ट्विटमधून लगावला.

ट्विट डिलीट केलं…

देशपांडे यांच्या टीकेनंतर लाड यांनी आपले ट्विट डिलीट केलं आहे. मात्र या ट्विटवर अनेकांनी लाड आणि भाजपाचा समाचार घेतला होता. देशपांडे यांनी या मुद्दा लक्षात आणू दिल्यानंतर त्यांच्या ट्विटवरही अनेकांनी रिप्लाय करुन भाजपावर टीका केली आहे. लाड यांनी ट्विट डिलीट केलं असलं तरी फेसबुकवरील त्यांची पोस्ट अद्याप तशीच आहे. या पोस्टमध्ये या उद्घाटन समारंभाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते आणि त्यांच्या हस्तेच छत्रपती शिवाजी महाराज बहुउददेशीय केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडल्याचे नमूद करण्यात आलं आहे. भाजपा आमदार आशिष शेलार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार कालिदास कोळमकर आणि भाजपा नेते तमिल सेलवन हे ही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भाजपा समर्थक म्हणतात…

मनसेने भाजपावर टीका केली असतानाच काही भाजपा समर्थकांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बहुउददेशीय केंद्राला देण्यात आले असून शौचालयाला देण्यात आलेले नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns leader sandeep deshpande bjps prasad lad scsg