महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी शिवाजी पार्कमध्ये घेतलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात ध्वनिप्रदूषणाची पातळी ५० डेसिबलच्या मर्यादेपलीकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वयंसेवी संस्था आणि शिवाजी पार्क पोलिसांनी केलेल्या नोदींमध्ये हे स्पष्ट झाले असून, त्याविषयी आलेल्या दोन तक्रारींवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी मनसेतर्फे गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परवानगी देताना उच्च न्यायालयाने सभास्थानी आवाज ५० डेसिबलच्या पातळीपलीकडे जाणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. मनसेने हे निर्देश पाळण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, सभा सुरू होण्याआधी वाजतगाजत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आवाजानेच १०० डेसिबलची पातळी ओलांडली होती. राज ठाकरे यांच्या भाषणादरम्यान आवाजाची पातळी ८५ डेसिबल इतकी होती. आवाज फाऊंडेशनने या ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजली असून त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्याची तक्रार केली आहे, तर पोलिसांतर्फेही ध्वनिप्रदूषणाचे मापन करण्यात आले असून त्याची तपासणी सुरू असल्याचे शिवाजी पार्क पोलिसांकडून सांगण्यात आले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.