मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेने पोस्टरद्वारे सेनेवर वार केला आहे. मागितले असते सात दिले असते, अशा आशयाचे बॅनर मनसेने लावले आहेत.

मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसैनिक संतापले आहेत. दादरमध्ये मनसेच्या महिला विभागअध्यक्ष स्नेहल जाधव आणि विभागअध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते, तेव्हा जिद्द जन्म घेते!, मागितले असते तर सातही दिले असते’ असे या पोस्टरवर म्हटले आहे.

नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसैनिक अस्वस्थ आहेत. शनिवारीदेखील शेकडो मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. आता मनसेने थेट पोस्टर लावून सेनेवर टीका केली आहे.

लोकसभा, विधानसभा आणि मग महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची बिकट अवस्था झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रीय झाले असून त्यांनी पक्षबांधणीवर भर दिला होता. एल्फिन्स्टनमधील घटनेनंतर राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चामुळे मनसैनिकांमध्ये उत्साह होता. मात्र याच दरम्यान पक्षाचे सहा नगरसेवक फुटल्याने मनसेला धक्का बसला आहे.