scorecardresearch

माहीमच्या समुद्रातील बांधकामावरच्या कारवाईवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; संदीप देशपांडे म्हणतात, “एवढी मोठी गोष्ट घडत असताना…!”

“तिथे बाजूलाच सागरी मार्ग पोलीस स्टेशन आहे. पोलिसांना छोट्यातल्या छोट्या गोष्टी माहिती असतात. एवढी मोठी गोष्ट तिथे होतेय हे त्यांना माहीत नसेल असं…!”

mns mahim dargah raj thackeray
माहीम समुद्रातील 'त्या' बांधकामावर पालिकेकडून कारवाई! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पार पडलेल्या पाडवा मेळाव्याच्या भाषणात माहीमच्या समुद्रात बांधण्यात आलेल्या मजारचा मुद्दा उपस्थित केला होता. ही मजार अनधिकृतरीत्या बांधण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मजार महिन्याभरात हटवली नाही, तर त्याशेजारीच गणपतीचं सर्वात मोठं मंदीर बांधण्याचा इशाराही राज ठाकरेंनी यावेळी दिला. या पार्श्वभूमीवर आज सकाळीच पालिकेकडून या मजारवर कारवाई करण्यात आली. यासंदर्भात आता मनसेकडून संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, उद्धव ठाकरे सरकारवरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

“त्याकडे दुर्लक्ष झालं की…”

संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात टीव्ही ९ ला प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलला होता. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला कोणत्याही प्रकारे थारा द्यायला नको. प्रशासनानं ज्या तत्परतेनं कारवाई केली, आम्ही त्यांचं अभिनंदन करू. पण गेल्या दोन वर्षांत ज्याप्रकारे अक्षम्यरीत्या या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. मविआच्या काळात, करोनाच्या काळात याकडे दुर्लक्ष झालं की जाणीवपूर्वक त्यांनी दुर्लक्ष केलं की त्यांना दुर्लक्ष करण्यास सांगण्यात आलं हा सगळा संशोधनाचा विषय आहे”, असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.

Video: पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा सरकारला इशारा; माहीमच्या समुद्रातील ‘तो’ व्हिडीओ दाखवून म्हणाले, “…नाहीतर तिथे गणपती मंदिर बांधू!”

“तिथे बाजूलाच सागरी मार्ग पोलीस स्टेशन आहे. पोलिसांना छोट्यातल्या छोट्या गोष्टी माहिती असतात. एवढी मोठी गोष्ट तिथे होतेय हे त्यांना माहीत नसेल असं मानायला माझं मन तयार होत नाही. हे सगळं करोनाच्या काळात झालं. मविआचं सरकार असताना हे घडलं”, असा दावाही संदीप देशपांडे यांनी केला.

“तिथे पुन्हा बांधकाम व्हायला नको”

दरम्यान, यासंदर्भात बोलताना मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे. “राज ठाकरेंनी हा मुद्दा काल मांडला. तातडीनं ती कारवाई झाली. यासाठी प्रशासनाचं अभिनंदन. पण यापुढे जबाबदारी वाढली आहे. अशाच प्रकारे जिथे कुठे अनधिकृतपणे बांधकाम होत असेल, तर यापुढेही त्यावर कारवाई होत राहिली पाहिजे. तिथे पुन्हा कुणी बांधकाम करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर त्यालाही प्रतिबंध करायला हवा. अधिक दक्ष राहायला हवं. नाहीतरी आज कारवाई झाली आणि उद्या तिथे पुन्हा बांधकाम झालं असं होऊ नये”, असं ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 11:21 IST

संबंधित बातम्या