ठाणे येथील पाचपखाडी भागातील एका बॅकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या युवकाला बतावणी करून त्याच्याकडील ४० हजार रुपये घेऊन पळण्याच्या तयारीत असलेल्या भामटय़ास नागरिकांनी बेदम चोप दिल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या मारहाणीत त्याचे अक्षरश: कपडे फाटल्याने नग्न अवस्थेत नागरिकांनी त्याची धिड काढल्याचे चित्र दिसून आले. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी त्या भामटय़ास अटक केली आहे.
तुळशीदास चंद्रकांत यादव उर्फ पाटील (३०), असे अटक करण्यात आलेल्या भामटय़ाचे नाव असून तो उल्हासनगर भागात राहतो. ठाणे येथील पाचपखाडी भागात राहणारा विजय परब (१९) हा युवक शुक्रवारी परिसरातील बँकेत पैसे भरण्यासाठी आला होता. त्यावेळी तुळशीदास याने त्याला गाठले आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीची मानसिक स्थिती ठिक नाही.
त्यामुळे आमच्याकडील एक लाख ४० हजार रुपये तू ठेव, अशी बतावणी केली. मात्र, त्यास विजयने नकार दिला. त्यावर तुळशीदासने त्याला ४० हजार रुपये देण्यास सांगितले आणि ही रक्कम परत केल्यानंतर आमचे पैसे दे, असे सांगितले. त्यानुसार, त्यांच्यात पैशांची देवाण-घेवाण झाली. पण, तुळशीदासने दिलेल्या बंडलातील नोटा खोटय़ा असल्याचे लक्षात येताच विजयने आरडाओरडा केला. त्यामुळे जमलेल्या नागरिकांनी तुळशीदासला पकडले व बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, त्याचा साथीदार पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2014 रोजी प्रकाशित
ठाण्यात चोरटय़ास बेदम मारहाण; धिंड
ठाणे येथील पाचपखाडी भागातील एका बॅकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या युवकाला बतावणी करून त्याच्याकडील ४० हजार रुपये घेऊन पळण्याच्या तयारीत असलेल्या
First published on: 01-02-2014 at 12:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mob badly attacked thief in thane