राज्यातील वाढत्या वीजदरामुळे औद्योगिक क्षेत्रात नाराजी असल्याच्या पाश्र्वभूमीवर औद्योगिक आस्थापनांची मर्जी राखण्यासाठी ‘महावितरण’ने धडपड सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून आता राज्यातील २५ औद्योगिक वसाहतींमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी २४ तास सेवा देणारी ‘फिरती गाडी’ तैनात करण्यात येणार आह़े  केवळ एक दूरध्वनी केला की ही गाडी काही मिनिटांत दुरुस्ती कामासाठी हजर होईल.
राज्यात उद्योगांना आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास वीजपुरवठा केला जातो. औद्योगिक वसाहतीत वीजपुरवठा खंडित झाला वा तांत्रिक बिघाड झाल्यास कमीत कमी वेळेत तो पूर्ववत व्हावा यासाठी ‘महावितरण’ने २५ एमआयडीसीमध्ये तात्काळ दुरुस्ती सेवा देणारी यंत्रणा उभारली आहे. रबाळे, महापे, तुर्भे, तळोजा, वागळे इस्टेट, भोसरी, आकुर्डी, हिंजेवाडी, चाकण, शिरोली, शेंद्रा, वसई, तारापूर-बोईसर, वाडा, अंबड- सातपूर, सिन्नर, जालना, महाड, सातारा, बारामती, अंबरनाथ, डोंबिवली आदी ‘एमआयडीसी’चा त्यात समावेश
आहे.
या तात्काळ दुरुस्ती यंत्रणेत ‘ब्रेक डाऊन अटेंडिंग व्हॅन’ २४ तास उपलब्ध राहणार आहे. ही गाडी एमआयडीसी भागातच तैनात असेल. गाडीत सात कर्मचारी साधनसामुग्रीसह सज्ज असतील. तीन सत्रात एकूण २१ कर्मचारी या गाडीवर तैनात असतील. विविध प्रकारच्या दुरुस्तीसाठी आवश्यक अशी ३० प्रकारची उपकरणे या गाडीत असतील. प्रत्येक गाडीत संपर्कासाठी मोबाईल फोन असेल.