सोशल मिडियाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही. त्यातला सर्वात मोठ तोटा म्हणजे, ग्रुपवर येणारे नको असलेले संदेश. सकाळी आपण उठण्यापूर्वी अनेकजण उठलेले असतात आणि त्यांचा जणू रोजगारच असावा अशा प्रकारे लोकं सकारात्मक संदेश, शुभ सकाळची छायाचित्रे, मंत्र, विनोद, व्हिडिओ पाठवू लागतात. आठवड्याचे पाच दिवस आपल्याला हे सर्वकाही नकोसं वाटत असतं. पण शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर येणारा सोमवार म्हणजे जणू शिक्षाच. त्यात जर तुमच्या आठवडा मस्त मजेत गेला असेल तर सोमवारी कार्यालयाला दांडी मारून त्याच आठवणींमध्ये रममाण व्हावेसे वाटत असते. तेव्हा त्या आठवणीमधून बाहेर पडून पुन्हा कामाला सुरूवात करण्यासाठी सकारात्मक विचार, नवीन पुस्तकं, व्यायामाचे प्रकार, एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री आपलं शरीर अधिक पिळदार बनवण्यासाठी काय करतंय याची छायाचित्रे, गाणी स्फुर्ती देत असतात. त्याचाच भाग म्हणून सोशल मिडियावर #MondayMotivation हा हॅशटॅग वापरून आठवड्याची सकारात्मक सुरूवात व्हावी यासाठी प्रेरणा दिली आणि घेतली जात असते. सोमवारी सकाळी हा हॅशटॅग हमखास ट्रेंडमध्ये असतो. त्यापैकीच काही निवडक टि्वट्स लोकसत्तेच्या वाचकांसाठी. तुम्हालासुध्दा सोमवारचा कंटाळा आहे का? मग तो कंटाळा घालवण्यासाठी तुम्ही काय करता तेसुध्दा #MondayMotivation हा हॅशटॅग वापरून पोस्ट करू शकता.