‘निलसेन्स आणि व्हॅल्यूनोट्स’चा अभ्यास अहवाल
मुंबई उपनगरातील दिंडोशी आणि दहिसर या पश्चिम उपनगरातील भागात सर्वाधिक अपघात होत असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे. जानेवारी २०१४ ते एप्रिल २०१६ या काळात या दोन ठिकाणी सुमारे ६ हजार ३५१ अपघात झाले असून सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत ३५ टक्के अपघात झाल्याचे ‘निलसेन्स आणि व्हॅल्यूनोट्स’ यांच्या अभ्यास अहवालातून स्पष्ट झाले आहे. यातील बहुतेक अपघात मान्सून काळात झाले आहेत.
मुंबई व उपनगरात रोज सुमारे २५ लाख वाहने रस्त्यावर धावत असतात. यात रिक्षा-टॅक्सी, कॅब, बसगाडय़ा आणि खासगी वाहनांचा समावेश असतो. पावसाळ्यात निसरडे रस्ते, खड्डे आणि वाहनांच्या अतिवेगामुळे गेल्या दोन वर्षांत शहरात ठिकठिकाणी अपघातांची नोंद झाली आहे. यात २०१४ ते २०१६ या काळात दिंडोशी भागात ३ हजार ३०४, दहिसर भागात ३ हजार ४७, वाकोला भागात २ हजार ४९९, वांद्रे-कुर्ला संकुल भागात २ हजार २४२, विक्रोळी भागात २ हजार ९३०, साकीनाका भागात २ हजार १४४, माटुंगा भागात २ हजार ४८५, चेंबूर भागात २ हजार ३८९ तर कुलाबा भागात १ हजार ४१३ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताची कारणे वेग मर्यादा न पाळणे, रस्ते निसरडे असणे, रस्त्यावर खड्डे असणे आणि दारू पिऊन वाहन चालवणे असल्याचे निरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. मान्सून काळात गंभीर अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या सहकार्याने एक ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आला. यात यापूर्वी अपघात झालेल्या ३५२ चारचाकी तर १५२ दुचाकी वाहनचालकांनी या माध्यमातून आपली मते नोंदवली.
वाहनांना उजव्या किंवा डाव्या बाजूने धडक दिल्याने, तातडीने ब्रेक मारल्याने मागील वाहनाची धडक बसल्याने तसेच अतिवेगाने गाडी उलटल्याने अपघात होत असल्याची कारणे नागरिकांनी नोंदवली आहेत. हे सर्वेक्षण ‘शेवरलेट इंडिया’ या वाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.
अपघात ठिकाणे संख्या
दिंडोशी ३,३०४
दहिसर ३,०४७
वाकोला २,४९९
वांद्रे-कुर्ला संकुल २,२४२
विक्रोळी २,९३०
साकीनाका २,१४४
माटुंगा २,४८५
चेंबूर २,३८९
कुलाबा १,४१३