स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण २९ टक्क्य़ांहून जास्त
देशभरात कर्करोगाचे उच्चाटन करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना राबविल्या जात असल्या तरी मुंबईत महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण ५१ टक्क्य़ांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यात स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण तर २९ टक्क्य़ांहून अधिक आहे. मुंबईत कर्करुग्णांसाठी काम करणाऱ्या ‘इंडियन कॅन्सर सोसायटी’ या संस्थेने २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे.
२०१० मध्ये स्तनांच्या कर्करूग्णाची संख्या ६२३६ इतकी होती आणि गेल्या सहा वर्षांत ती सुमारे सात हजारापर्यंत पोहोचली आहे, तर पुरूषांमध्ये तोंडाचा आणि फुप्फुसाच्या कर्करुग्णांची संख्या अनुक्रमे ६३५, ६८८ इतकी आहे. थोडक्यात सर्वेक्षणानुसार मुंबईत कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. आकडेवारीनुसार मुंबईत सुमारे १३,५०० रुग्णांना कर्करोगाची बाधा झाली आहे. साठ वयोगटातील नागरिकांना कर्करोगाची बाधा होण्याचे प्रमाण ५० टक्के इतके आहे.
सध्याच्या जीवनशैलीमुळे कर्करोग झपाटय़ाने वाढत आहे. यामुळे आजही कर्करोगाबाबत जनजागृतीची गरज असल्याचे इंडियन कॅन्सर सोसायटीचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय देशमाने यांनी सांगितले. १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण ४० टक्क्य़ांपर्यंत पोहोचले आहे. ४ फेब्रुवारी रोजी कर्करोग दिनाच्या निमित्ताने मुंबईतील कर्करोगाचे भयानक वास्तव समाजासमोर आले. कर्करोगाची बाधा होऊ नये यासाठी जीवनशैली आरोग्यदायी करण्याची गरज आहे. यासाठी स्थानिक पातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबईतील ४ मुलींमध्ये डोळ्यांचा कर्करोग
इंडियन कॅन्सर सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणात चार मुलींमध्ये डोळ्याचा कर्करोग आढळून आला आहे. गेल्या पाच वर्षांत डोळ्याच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून देशात प्रत्येक वर्षांला २००० डोळ्यांच्या कर्करोगाचे रुग्ण दाखल होत आहेत.