गाडी चालक असलेल्या युवकाशी असलेल्या प्रेम संबंधांत अडसर ठरल्यामुळेच आईनेच मुलाचा काटा काढल्याचे उघड झाले असून त्यामुळेच गोरेगाव येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या हत्येची उकल करण्यात बांगूर नगर पोलिसांना यश आले आहे.
गोरेगाव पूर्वेतील बांगूर नगर परिसरात सिसिली डिसूझा (५४) या मुलगा रोनाल्ड (३५) व मुलीसह राहत होत्या. वर्षभरापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. ८ डिसेंबर रोजी आपल्या मोठय़ा मुलाची अज्ञात इसमांनी चोरीच्या हेतूने हत्या केल्याचा दूरध्वनी त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला केला होता. या प्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक फटांगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
हत्या घडली तेव्हा आपण एका मैत्रीणीकडे गेलो होतो आणि त्यानंतर काही काळ फिरण्यास गेलो होतो, असे सिसिली यांनी पोलिसांना जबाबात सांगितले होते. याची शहानिशा करताना त्यात विसंगती आढळून आली. त्यामुळे त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात आले. परंतु काही मिनिटातंच त्यांनी खुनाची कबुली दिल्याचे उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले. या कबुली जबाबानंतर तिचा गाडी चालक भरत गोने (२५) आणि त्याचा मित्र दीपक याला पोलिसांनी अटक केली.
सिसिली यांच्याकडे भरत गाडी चालक म्हणून काम करीत होता. सिसिली यांचे पती आजारी असताना भरतने त्यांना भरपूर मदत केली होती. त्यातूनच त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या संबंधास रोनाल्ड आक्षेप घेत असे. दोन-तीन वेळा त्याने भरतला मारहाणही केली होती. आपल्या प्रेमसंबंधात मुलगा अडथळा असल्याचे वाटून सिसिली यांनी त्याचाच काटा काढण्याचे ठरविले. भरत आणि दीपकला घराची चावी दिली आणि आपण घराबाहेर जाऊ तेव्हा त्याची हत्या करण्यास सांगितले. ८ डिसेंबर रोजी ती संधी मिळाली आणि या दोघांनी रोनाल्डचा काटा काढला व तसा दूरध्वनी सिसिली यांना केल्याचेही तपासात उघड झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2015 रोजी प्रकाशित
गोरेगावात आईनेच मुलाची हत्या केल्याचे उघड!
गाडी चालक असलेल्या युवकाशी असलेल्या प्रेम संबंधांत अडसर ठरल्यामुळेच आईनेच मुलाचा काटा काढल्याचे उघड झाले
Written by रत्नाकर पवार

First published on: 12-12-2015 at 04:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother killed son