‘एबी आणि सीडी’ अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार

मुंबई : मार्च महिन्यात देशात करोनाची चाहूल लागताच सर्वप्रथम चित्रपटगृहे आणि मॉल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १४ मार्चच्या आठवडय़ात प्रदर्शित झालेले आणि त्याआधीच्या आठवडय़ात प्रदर्शित झालेले आणि चांगली कमाई करत असलेले हिंदी-मराठी चित्रपट अशा सगळ्याच चित्रपटांचे प्रदर्शन थांबले आहे. या रखडलेल्या चित्रपटांना टाळेबंदी उठायच्या आधीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही अंशी ओटीटी प्लॅटफॉम्र्सचा आधार मिळतो आहे. हिंदीत ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर तर मराठीत ‘एबी आणि सीडी’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी १४ मार्चला चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याआधी १३ मार्चला हिंदीत ‘अंग्रेजी मीडियम’ आणि मराठीत ‘एबी आणि सीडी’सह आणखी काही चित्रपट प्रदर्शित झाले होते. मात्र चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत असूनही चित्रपटगृहांअभावी हे चित्रपट रखडले. टायगर श्रॉफचा ‘बागी ३’ हा चित्रपट त्याआधीच्या आठवडय़ात ६ मार्चला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने दुसऱ्या आठवडय़ात शंभर कोटींचा आकडा पार के ला होता, मात्र टाळेबंदीमुळे तोही रखडला.

फे ब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने तोही काही चित्रपटगृहांमधून टिकाव धरून होता. मात्र टाळेबंदीमुळे महिनाभरापेक्षा जास्त काळ रखडलेल्या या चित्रपटांना प्रदर्शनासाठी आणखी दोन ते तीन महिने वाट पाहावी लागणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आपले चित्रपट तूर्तास ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

‘शुभमंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झाला असून ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट नव्याने सुरू झालेल्या ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित करण्यात आला आहे. तर ‘बागी ३’ आणि ‘एबी आणि सीडी’ हे दोन चित्रपट १ मेच्या मुहूर्तावर अनुक्रमे ‘हॉटस्टार’ आणि ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित होणार आहेत. टाळेबंदी ३ मेला उठली तरी चित्रपटगृहे लवकर सुरू होणार नाहीत. शिवाय, अनेक खबरदारीच्या उपाययोजना आखूनच चित्रपटगृहे सुरू होतील. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनावर अनेक निर्बंध येणार असल्याचे चित्र दिसते आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सध्या प्रेक्षक घरातच ओटीटी प्लॅटफॉम्र्सवर जास्त असल्याने  तिथे चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांना जास्त व्यवहार्य वाटतो  आहे.

एबी आणि सीडीअंदाजे १० लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल

अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले  या जोडीला एकत्र आणणारा ‘एबी आणि सीडी’ हा आमचा चित्रपट ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वरून अंदाजे १० लाख लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे पुन्हा पैसे खर्च करून हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करणार नाही. तिकीटबारीवरचे आर्थिक नुकसान झाले असले तरी ओटीटी प्रदर्शनातून चित्रपटाला चांगली रक्कमही मिळाली असल्याचे निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.