मुंबई : राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच रेल्वे गाडय़ांना असलेली प्रतीक्षायादी, खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून होणारी लूट यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. प्रवाशांचे हाल होत असल्याने राज्य सरकार, विरोधी पक्ष, एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांच्याही भूमिकेवर प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा आहे, परंतु संपाला नाही, असेही स्पष्ट करतानाच प्रवाशांचे होणारे हाल थांबवा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा राज्यातील विविध प्रवासी संघटनांनी दिला आहे.

एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून त्याचा खासकरुन ग्रामीण भागातील जनतेला मोठा फटका बसत असल्याची खंत मुंबईतील गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली.  कर्मचाऱ्यांच्या मागणीला समर्थन आहे, पण संपाला नाही. राज्य सरकार, एसटी महामंडळ, विरोधी पक्ष, कर्मचारी संघटनांनी सामंजस्याने हा प्रश्न सोडवावा आणि प्रवाशांचे हाल थांबवावे. यात कोणतेही राजकारण होता कामा नये, असेही ते म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची वाटचाल गिरणी कामगारांच्या संपाच्या दिशेनेच होऊ लागली आहे. सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, कर्मचारी संघटना या तिघांच्या ताठर भूमिकेमुळे राज्यातील एसटी प्रवाशांचे हाल होत आहेत. संप मागे घ्यावा ही कळकळीची विनंती आहे. कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे हाल हे सर्वानाच माहीत असून त्यावर राज्य सरकार व महामंडळ, संघटना, विरोधी पक्ष या सर्वानी त्वरित तोडगा काढावा आणि सर्वसामान्यांसाठी एसटी सुरु करावी अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा सोलापूरमधील प्रवासी संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिला.

,२९६ कर्मचाऱ्यांना नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटीमध्ये एकूण २,५८४ कर्मचारी रोजंदारीवर असून यात २९ चालक, २,१८८ चालक तथा वाहक, १८२ वाहक, ९७ सहाय्यक, ८८ लिपिक व टंकलेखक आहेत. यामधील २,२९६ कर्मचाऱ्यांवर नोटीस बजावण्यात आली असून २४ तासांत कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. नोटीस बजावलेल्यांमध्ये सर्वाधिक २,१०१ चालक तथा वाहकांचा समावेश आहे. यावरुन चालक तथा वाहकांना कामावर रुजू करुन एसटी सेवा सुरु करण्याचा प्रयत्न महामंडळाचा असल्याची चर्चा आहे.