मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी के लेल्या संपाबाबत महामंडळाने मंगळवारी कर्मचारी संघटना आणि संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र ही प्रक्रिया न्यायालीन वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे एसटी महामंडळातर्फे बुधवारी अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणी बुधवारी होणाऱ्या सुनावणीवेळी अवमान याचिका दाखल करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या संघटना आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी महामंडळातर्फे  केली जाणार आहे.

 एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची आणि त्याबाबतचा शासन आदेश काढण्याची मागणी सरकारकडून मान्य होऊनही एसटी कर्मचारी संघटनांनी संप सुरू ठेवल्याच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. तसेच संप मागे घेण्याच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा वारंवार अवमान करणाऱ्या संघटना किंवा कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची मुभा महामंडळाला दिली होती. समिती स्थापन करण्याबाबतचा शासन आदेश काढण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. तसेच ती पूर्ण झाल्यावर संप मागे घेण्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले होते. सरकारने त्यांचा शब्द पाळल्यानंतर मात्र शासन आदेश आपल्याला मान्य नसल्याचे सांगत संघटनांनी संप कायम ठेवण्याची भूमिका घेतली. संघटनांची भूमिका समजण्यापलीकडची आहे. शिवाय त्यांच्या या आडमुठय़ा भूमिकेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का, असेही न्यायालयाने संघटनांच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना नमूद केले होते.