एक हजार कोटींवर गेलेल्या संचित तोटय़ामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या एसटी महामंडळाने आता डिझेलच्या दरांत झालेली वाढ लक्षात घेऊन ‘आपोआप भाडेवाड सूत्रा’नुसार दरवाढ केली आहे. ही दरवाढ २.५४ टक्के एवढी अल्प असून प्रवाशांवर कमीत कमी भर पडेल, याची काळजी घेण्यात आली आहे. मात्र या दरवाढीमुळे वातानुकुलित सेवेच्या दरांत थेट १५ रुपयांनी वाढ झाली असून आता मुंबई-पुणे प्रवासासाठी ३९० रुपयांऐवजी ४०५ रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ ७ मार्चपासून राज्यभरात लागू होणार आहे.
आपोआप भाडेवाढ सूत्र ..
राज्य सरकारने एसटी महामंडळासाठी आपोआप भाडेवाढ सूत्र लागू केले आहे. या सूत्रानुसार टायर, महागाई भत्ता, सुटे भाग आणि डिझेल या चार घटकांपैकी एकाच्याही किमतीत वाढ झाली की, एसटी महामंडळ आपल्या तिकिटांच्या दरांत वाढ करू शकते.  त्यासाठी रस्ते वाहतूक प्राधिकरणाची परवानगी घेण्याची गरज नाही.