डिझेलच्या वाढत्या दरांचे कारण देऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बुधवारी पुन्हा एकदा ०.८० टक्क्यांची भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीचा फटका गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना सर्वाधिक बसणार आहे. ही दरवाढ २२ ऑगस्टपासून लागू होणार असली, तरी त्याआधी किंवा त्या दिवशी आरक्षण करणाऱ्या प्रवाशांकडून प्रवासादरम्यान भाडय़ातील फरक वळता करून घेतला जाणार आहे.
एसटीचे सामूहिकरित्या आरक्षण (ग्रुप बुकिंग) केलेल्या चाकरमान्यांनाही वाढीव दर भरावा लागणार आहे. रेल्वे प्रवासाच्या दरवाढीविरोधात थेट संसदेपर्यंत जाणारे खासदार आणि आमदार आता कोकणातल्या प्रवाशांना बसणाऱ्या एसटी दरवाढीच्या फटक्याबाबत गप्प का, असा प्रश्न विविध प्रवासी संघटना करत आहेत.
एसटीचा संचित तोटा २०० कोटींच्या पार पोहोचला आहे. त्यातच दर महिन्यात डिझेलचे दर वाढल्यानंतर एसटीला आणखी आर्थिक तोटा सहन करावा लागतो. गेल्या सहा महिन्यांत एसटीने चार वेळा दर वाढवत ६ टक्क्यांची घसघशीत दरवाढ केली होती. त्यातच आता बुधवारी काढलेल्या दरवाढीच्या आदेशाची भर पडली आहे. ही दरवाढ अत्यल्प असल्याचा दावा एसटी प्रशासन करत आहे. मात्र गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच दरवाढीचे अस्त्र उगारून गणेशभक्तांना संकटात टाकणाऱ्या एसटी प्रशासनाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी आहे. एसटीने ०.८० टक्के दरवाढ केली आहे.
म्हणजेच एसटीच्या दर सहा किलोमीटर प्रवासामागे तिकिटात ५ पैशांची वाढ होणार आहे. वास्तविक एवढय़ा अल्प दरवाढीमुळे एसटीला फार मोठा फायदा होणार नाही. असे असतानाही गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीला दरवाढ करण्याचे अडले होते का, असा प्रश्न प्रवासी करत आहेत. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी महिनाभर आधीपासूनच ग्रुप बुकिंगसह इतर आरक्षणे केली आहेत. मात्र आता या प्रवाशांना प्रवासादरम्यान आणखी वाढलेल्या भाडय़ाची रक्कम चुकवावी लागणार आहे. या प्रकरणात काही गडबड गोंधळ झाल्यास त्याची जबाबदारी महामंडळानेच स्वीकारावी, असे गणेशभक्त संघटनेने एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. एसटीने गणेशोत्सवानंतर दरवाढीचा विचार करावा, असेही या संघटनेने म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2014 रोजी प्रकाशित
एसटीची भाडेवाढ
डिझेलच्या वाढत्या दरांचे कारण देऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बुधवारी पुन्हा एकदा ०.८० टक्क्यांची भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीचा फटका गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना सर्वाधिक बसणार आहे.
First published on: 21-08-2014 at 03:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc hikes bus fares