लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता खडतर वाहन चाचणी

एसटीत लवकरच महिला चालक, वाहक सेवेत येणार आहेत. एसटी महामंडळाकडून चालक तथा वाहक पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जवळपास २०० महिला उमेदवार या पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. यानंतर आता कागदपत्र तपासणी आणि वाहन चालन चाचणीच्या खडतर परीक्षेतून महिला उमेदवारांना जावे लागेल.

एसटी महामंडळात ७ हजार ९२९ चालक तथा वाहक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. या पदासाठी एकूण २८ हजार ३१४ उमेदवारांनी अर्ज केले. यात ४४५ अर्ज हे महिलांचे होते. त्यांची २ जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. ४४५ महिला उमेदवारांपैकी जवळपास २०० महिला पास झाल्या आहेत. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वाहन चाचणी भोसरी, पुणे  येथील संगणकीकृत वाहन चालन चाचणीच्या जागेवर घेण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकण प्रदेशातील प्रथम सिंधुदुर्ग विभागातील उमेदवारांची ७ सप्टेंबरपासून तर ११ सप्टेंबर रोजी कोकण प्रदेशातील सर्व पात्र महिला उमेदवारांची कागदपत्र तपासणी व त्यातीलही पात्र महिलांची वाहन चालन चाचणी घेण्यात येणार आहे. इतर विभागातील उमेदवारांच्या तारखा त्यांना एसएमएस व ई-मेलव्दारे कळवण्यात येतील. उमेदवारांनी अपूर्ण कागदपत्रासह उपस्थित राहिल्यास किंवा गैरहजर राहिल्यास त्यांना अपात्र घोषित करण्यात येईल आणि त्यानंतर कोणतेही प्रतिवेदन विचारात घेतले जाणार नाही, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जवळपास २०० महिला उमेदवार चालक तथा वाहक पदाची परीक्षा पास झाल्या आहेत. पुढील होणाऱ्या वाहन चाचणीच्या परीक्षेत त्यांना पास व्हावे लागेल. 

– रणजित सिंह देओल, (एसटी महामंडळ-उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक)