लवकरच एसटी महामंडळाकडून निर्णय

मुंबई : बेस्ट उपक्रमासाठी एसटी महामंडळाने बस तसेच चालक व वाहक उपलब्ध करून दिल्यानंतर आता मुंबईत असणारी करोनास्थिती पाहता एसटी गाडय़ांची संख्या आणखी कमी करण्याचा विचार महामंडळ करत आहे. मात्र रेल्वे प्रवासावर निर्बंध आणि बेस्टच्या गाडय़ांची संख्या कमी होणार असल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या ५०० एसटी बेस्टच्या सेवेसाठी धावत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातील चालक, वाहक व तांत्रिक कर्मचाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर करोनाबाधित होत असून त्यांना गैरसोयींनाही तोंड द्यावे लागत असल्याने गाडय़ा कमी करण्याचा विचार एसटी करत आहे.

करोनाकाळात बेस्टच्या बसगाडय़ांना प्रचंड गर्दी होऊ लागल्याने अंतराचे नियम पायदळी गेले. त्याशिवाय कमी पडणाऱ्या गाडय़ा आणि वाहतूक कोंडी यामुळे बेस्ट थांब्यावर प्रवासी बसची तासन्तास वाट पाहू लागले. त्यामुळे २४ सप्टेंबर २०२० पासून बेस्टच्या मदतीला मुंबईबाहेरून टप्प्याटप्प्यात एक हजार एसटी गाडय़ा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेस्ट उपक्रमाने एसटी गाडय़ा दर किलोमीटरमागे ७५ रुपये भाडेदराने घेतल्या आणि या एसटी मुंबईतील कानाकोपऱ्यात धावू लागल्या. परंतु जून २०२० पासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेल्या लोकलमधून हळूहळू विविध श्रेणींतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी दिली. परिणामी बेस्टच्या ताफ्यातील एसटीची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि जानेवारी २०२१ पर्यंत एक हजारपैकी टप्प्याटप्प्यात ५०० एसटी काढून घेण्यात आल्या. आता ५०० एसटी गाडय़ा धावत आहेत.

बेस्टच्या सेवेसाठी असलेल्या एसटीवर चालक, वाहकांची नियुक्ती एसटी महामंडळाकडून केली जाते. मुंबईबाहेरूनच एसटी चालक, वाहकांना एक ते दोन आठवडय़ांच्या कालावधीसाठी बोलावले जाते. त्या कर्मचाऱ्याचा कालावधी संपला किंवा दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येते. या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०२० पासूनच गैरसोयींचा सामना करावा लागला. राज्यातील विविध भागांतून मुंबईत बेस्ट सेवेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. दुसऱ्या लाटेच्या आधीपासूनच या परिस्थितीला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत असून ५० वर्षांवरील कर्मचारी, तसेच अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांचीही नियुक्त बेस्टच्या सेवेसाठी करण्यात येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. मुंबईत असलेली करोनाची स्थिती आणि सध्या अत्यावश्यक सेवांसाठीच बेस्ट व एसटीचा वापर होत असल्याने एसटी गाडय़ांची संख्या आणखी कमी करण्याचा विचार महामंडळ करत आहे.

बेस्ट वाहतुकीमध्ये येणाऱ्या अडचणी संघटनेने वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिल्या. मात्र त्यामध्ये सुधारणा होत असल्याचे दिसत नाही. करोनाकाळात सर्व आस्थापना बंद असताना एसटी कर्मचारी मात्र जिवाची जोखीम पत्करून मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी कर्तव्य बजावत आहेत. इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना काम करताना ज्या सुविधा दिल्या जातात, त्या एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या जात नाहीत.

संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

मुंबईतील करोनाची स्थिती व राज्याच्या विविध भागांतून येणारे चालक, वाहक व अन्य कर्मचाऱ्यांची गैरसोय पाहता सध्या बेस्टच्या सेवेसाठी असलेल्या ५०० एसटीची संख्या आणखी कमी करता येईल का ते पडताळून पाहात आहोत. जेणेकरून प्रवासी, चालक व वाहकांचीही गैरसोय होणार नाही. त्यावर लवकरच निर्णय घेऊ.

अनिल परब, परिवहनमंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष