भारतीय अभिजात संगीतात स्वत:च्या सर्जनाचा अमीट ठसा उमटविणारे पंडित मुकुल शिवपुत्र यांच्याशी स्वरगप्पा करण्याची संधी येत्या २५ मार्च रोजी लोकसत्ताच्या लोकसत्ता गप्पा या उपक्रमांतर्गत निमंत्रितांना उपलब्ध होणार आहे. गेली सुमारे चार दशके संगीताच्या क्षेत्रात मुकुलजींनी आपली सांगीतिक कारकीर्द तळपती ठेवली आहे. केवळ कलावंत म्हणून नव्हे, तर संगीताबद्दलचे स्वतंत्र विचार करणारे गायक म्हणून ते सर्वाना परिचित आहेत. सर्जनाची अतिशय गूढ प्रक्रिया उलगडून पाहण्याचा आणि त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा ध्यास घेतलेल्या या कलावंताशी होणाऱ्या या गप्पा ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आल्या आहेत.

‘केसरी’ या कार्यक्रमाचे ‘असोसिएट पार्टनर’ असून ‘झी २४ तास’ ‘टेलिव्हिजन पार्टनर’ आहेत.

गेल्या काहीशे वर्षांच्या ख्याल गायनाच्या परंपरेत अनेक दिग्गजांनी आपापली प्रतिभा मांडली. परंपरेत मिसळत जाणारे नावीन्य आणि त्यातून नव्याने निर्माण होणारी कलाकृती हे भारतीय अभिजात संगीताचे वैशिष्टय़ जगभरातील संगीतरसिकांसाठी नेहमीच आकर्षण ठरले आहे.

या परंपरेत नवनिर्मितीची अपूर्व भर घालणारे पं. कुमार गंधर्व यांचे पुत्र असलेल्या मुकुल शिवपुत्र यांची संगीताकडे पाहण्याची स्वत:ची खास दृष्टी आहे. त्यामागे गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा अभ्यास आहे. भारतीय संगीतात असलेल्या विविध प्रवाहांचे भान असलेले मुकुलजी हे काळाच्या पुढे असलेले कलावंत असल्याचे मत अनेक संगीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे आकलन ही सर्वात अवघड गोष्ट मुकुलजींना सहजसाध्य झाली, याचे कारण त्यांना संगीताच्या माध्यमातून साऱ्या विश्वाचे भान मिळवण्याचे कौशल्य आत्मसात करता आले. देशातील अनेक भागांत ते सातत्याने प्रवास करीत असतात, तेव्हा तेथील संगीत परंपरांबद्दल अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच मैफलीत पंजाबी ढंगाच्या बंदिशीही ते अतिशय तयारीने सादर करू शकतात.