मुंबई : रेल्वे प्रवाशांनी शॉर्टकट वापरून रेल्वे रूळ ओलांडू नयेत, यासाठी सरकते जिने आणि पादचारी पूल बांधले आहेत. गर्दीच्या स्थानकात प्रवाशांची रहदारी वेगाने व्हावी यासाठी सरकत्या जिन्यांच्या संख्येत वाढ केली जात असून मध्य रेल्वे मार्गावरील गर्दीच्या स्थानकांपैकी एक, मुलुंड स्थानकात तीन नवीन सरकते जिने गुरुवारपासून सुरू होतील. सध्या स्थानकात दोन सरकते जिने असून वाढीव सरकत्या जिन्यांमुळे गर्दीचे विभाजन करणे सोयीचे होईल.
हेही वाचा >>> राखीव निकालामुळे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना द्यावी लागणार एटीकेटी परीक्षा
मुलुंड येथून दररोज सुमारे ८०० लोकल धावत असून त्यातून दररोज तब्बल १.३१ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जातात. यापैकी सरकते जिन्यांची उभारणी केली जातेय. मुलुंड स्थानकात दोन पश्चिमेकडे आणि एक पूर्वेकडे सरकता जिना उभारला आहे. या नवीन सरकत्या जिन्यामुळे आणि नाविन्यपूर्ण यंत्रणेमुळे लाखो प्रवाशांच्या प्रवासात सकारात्मक बदल होईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> मुंबईतील हँगिग गार्डन सात वर्षांसाठी होणार बंद, पालिकेने सांगितलं ‘हे’ कारण!
सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १३२ सरकते कार्यरत असून वाढीव ५४ सरकते जिने बसवण्यात येतील. या नवीन सरकत्या जिन्यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवली आहे. सरकता जिना बंद झाल्यास, काही तांत्रिक समस्या जाणवू लागल्यास त्वरित नियंत्रण कक्षाला सुचित करेल. त्यानंतर बिघाडाचे कारण शोधून काही वेळातच सरकता जिना पूर्ववत केला जाईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.