मुंबई विमानतळाने २४ तासांमध्ये सर्वाधिक विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. शुक्रवारी २४ तासांमध्ये मुंबई विमानतळावरुन ९६९ विमानांनी यशस्वी टेक ऑफ आणि लँडिंग केले. विशेष म्हणजे याआधीही हा विक्रम मुंबई विमानतळाच्याच नावावर होता. याआधी मुंबई विमानतळावर २४ तासांमध्ये ९३५ विमानांचे यशस्वी टेक ऑफ आणि लँडिंग करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई विमानतळाने २४ तासांमध्ये सर्वाधिक विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ करण्याचा विक्रम केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी दिली. न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि दिल्ली या शहरांमधील विमानतळांवरील दोन किंवा अधिक धावपट्ट्यांवरुन एकाचवेळी विमानांचे लँडिंग किंवा टेक ऑफ केले जाते. मुंबईतही दोन धावपट्ट्या आहेत. मात्र त्या एकमेकांना छेदून जातात. त्यामुळे एकावेळी एकाच धावपट्टीचा वापर करता येतो. या कारणामुळे मुंबई विमानतळाचा समावेश एकच धावपट्टी असलेल्या विमानतळांच्या यादीत होतो.

मुंबई विमानतळासारखीच विमानतळे लंडन (गॅटविक, स्टॅन्स्टड विमानतळ), इस्तंबूलमध्ये (सबिहा गॉक्सन विमानतळ) आहेत. याशिवाय सॅन डिएगो (अमेरिका), फुकुओका (जपान) आणि जियामेन (चीन) या विमानतळांवरही एकच धावपट्टी आहे. मुख्य विमानतळांवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी या विमानतळांचा वापर केला जातो. मुंबई विमानतळावरुन दररोज ९०० हून अधिक विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होते. या विमानतळावरुन लवकरच प्रतिदिन एक हजाराहून अधिक विमाने ये-जा करतील, असा विश्वास विमानतळ प्रशासनाच्या प्रवक्त्यांना आहे.

गॅटविक हे जगातील एकमात्र असे विमानतळ आहे, ज्या ठिकाणी केवळ एकच धावपट्टी असूनही दर तासाला नियमितपणे ५० हून अधिक विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होते. तर एकच धावपट्टी असलेल्या इतर विमानतळांवरुन दर तासाला ४२ किंवा त्यापेक्षा कमी विमाने ये-जा करतात. या यादीत मुंबई गॅटविकनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई विमानतळावरुन दर तासाला ५० हून अधिक विमानांची ये-जा होते. मात्र यामध्ये गॅटविक विमानतळासारखी नियमितता नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai airport handles 969 flights in 24 hours sets new world record
First published on: 26-11-2017 at 14:05 IST