बेस्टकडून मिनी वातानुकूलित बस गाडय़ा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर बेस्ट उपक्रमाने १ ऑक्टोबरपासून प्रवाशांसाठी तीन मार्गावर सात वातानुकूलित मिनी बसगाडय़ा सुरू केल्या आहेत. प्रभादेवी, सिद्धिविनायक, बेलार्ड पियर परिसरात या वर्तुळाकार बस सेवा दिली जात असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

बस मार्ग क्रमांक ए-५४ ही कोहिनूर पी.पी.एल ते सिद्धिविनायक मंदिर ते कोहिनूर पी.पी.एल. वर्तुळाकार वातानुकूलित बस सेवा १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. बस क्रमांक ५४ ची पहिली बस फेरी सकाळी आठपासून, तर याच मार्गावर ए-५५ बस धावत असून त्याची पहिली फेरी सकाळी ८.२० पासून होत आहे. प्रभादेवी स्थानक ते महिंद्रा टॉवर ते प्रभादेवी स्थानक अशी आणखी एक बस सेवाही सुरू करताना सकाळी सात ते रात्री दहापर्यंत दर १४ मिनिटाला एक फेरी बसची होत आहे. ही विजेवर धावणारी बस असल्याचे सांगितले.

याशिवाय बेलार्ड पियर व अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) मार्गावरही तीन वातानुकूलित बसगाडय़ा दर दहा मिनिटांनी सुरू करण्यात आल्या आहेत.

बेलार्ड पियर येथून पहिली बस सकाळी ८.१५ वाजता आणि अहिल्याबाई होळकर चौक येथून सकाळी आठ वाजता बस सोडण्यात येत आहे. रविवार सोडता सोमवार ते शनिवापर्यंत ही बस धावणार

आहे. सिद्धिविनायक मंदिर मार्गावर सुरू करण्यात आलेली वातानुकूलित बस सेवेचे नियोजन दोन महिने आधीच केले होते, परंतु वातानुकूलित बसगाडय़ा नुकत्याच दाखल झाल्यानंतर त्याची सेवा १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली, असे स्पष्टीकरण बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आले. तर जसजशा वातानुकूलित बसगाडय़ा ताफ्यात आल्या त्याप्रमाणे त्यांची सेवा दिली जात आहे.