डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत मृत्यूशी तब्बल ३३ तास झुंज देऊन चंद्रशेखर जाधव वाचले. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास जाधव यांना इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. ५५ वर्षांच्या जाधव यांची दुखापतही तशी किरकोळ आहे. त्यांच्या पायाला मार लागला आहे. पण, जाधव यांचे दुदैव हे की त्यांची पत्नी जयवंती आणि दोन मुली व मुलगा असे संपूर्ण कुटुंबच अजुन बेपत्ता आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाधव कुटुंब राहत होते.
इमारत दुर्घटनेत सापडलेल्यांना बहुतांश रहिवाशांवर भायखळ्याच्या जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास चंद्रशेखर यांना जेजेमध्ये आणण्यात आले. त्या आधी जयाबेन छावडा (वय ४५) या मध्यवयीन महिलेला ढिगाऱ्याखालून सुखरूप काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
जाधव यांच्याप्रमाणे या दुर्घटनेत बचावलेले अशोक सोळंकी (वय३४) आणि त्यांची सात वर्षांची मुलगी मिनल हिचेही नशीब त्या सकाळी बलवत्तर निघाले. कारण हे दोघेही मृत्यूच्या दाढेत जाता जाता परत आले.
एरवी आईकडे असणारी मिनल त्या रात्री वडिलांसोबत झोपली होती. खाटेखाली अडकून राहिल्यामुळे वरचे छत पडूनही सोळंकी आणि मिनल सुखरूप राहिले. सोळंकी यांनी सेलफोन प्रकाशात मिनल आपल्या शेजारी आहे की नाही याची खात्री केली. मिनलच्या डाव्या पायावर छताचा भाग कोसळल्याने दुखापत झाली.तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे तिची आत्या अमिता सोडा हिने सांगितले.
एनडीआरएफचे बचाव कार्य
राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाने (एनडीआरएफ) अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून बचावकार्य सुरू केले होते. रहिवाशी इमारत कोसळली तेव्हाच मोठी जिवितहानी होणार असल्याची शक्यता गृहीत धरली होती अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाचे प्रमुख आलोक अवस्थी यांनी दिली. बचाव दलाचे एकूण १५० जवान काम करत आहेत. अडकलेल्या लोकांना शोधणारा कॅमेरा (व्हिक्टीम लोकेशन कॅमेरा), लाईफ डिटेक्शन सिस्टिम, एअर लिफ्टिींग बॅग आदींचाही वापर दलाने बचावकार्यासाठी केला. एखादा माणूस अडकला असले तर त्याची सुटका करण्यासाठी एअर लिफ्टिंग बॅगेचा उपयोग होतो. ही बॅग ७० टनापर्यंतचे वजन उचलू शकते. शुक्रवारी या बॅगेच्या सहाय्याने स्लॅब खाली अडकलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आल्याचे राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाचे डेप्युटी कमांडर सच्चिदानंद गावडे यांनी सांगितले.



