भेंडीबाजारात इमारत कोसळली; मृतांची संख्या २० वर

अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत

Loksatta, Loksatta news, loksatta newspaper, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi, Samachar, Marathi latest news, mumbai news, mumbai news in marathi, Mumbai latest news, building, collapsed, JJ Junction, Pakmodia street, people, trapped, rescue operation
भेंडीबाजार येथे हुसैनवाला इमारत कोसळली असून ही इमारत किमान १०० वर्ष जुनी होती असे सांगितले जाते.

मुंबईतील जे जे मार्ग परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ढिगाऱ्या खालून संध्याकाळपर्यंत २० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकले असून घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले आहे. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

जे जे जंक्शन येथील पाकमोडिया स्ट्रीटवर सकाळी आठच्या सुमारास तीन मजली निवासी इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकले असावे असे सांगितले जाते. या दुर्घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीमध्ये एकूण नऊ कुटुंबे राहत होती. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखालून तीन जणांना बाहेर काढण्यात आले असून जखमींवर जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मदतकार्यासाठी घटनास्थळी एनडीआरएफचे पथकही रवाना झाल्याचे समजते. ही इमारत १०० ते १२५ वर्षे जुनी असल्याचे स्थानिक नगरसेवक अतूल शहा यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.सकाळची वेळ असल्याने कुटुंबातील अनेक जण घरातच होते असे समजते.

गेल्या महिभरात मुंबई आणि उपनगरात इमारत कोसळल्याची तिसरी घटना आहे. यापूर्वी २५ जुलैरोजी घाटकोपरमध्ये साई दर्शन इमारत कोसळली होती. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी विक्रोळीत इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.

LIVE UPDATES

५:५५ – मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत २० मृतदेह बाहेर काढण्यात आले. मदतकार्य सुरूच

०४:३० – मृतांचा आकडा १६ वर

०४:२३ – मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

०३:१७ – मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करुन दूर्घटनेची माहिती घेतली,जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश, दुर्घटनेच्या चौकशीचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले

०३:०२ – मृतांची संख्या १४ तर जखमींची संख्या १५ वर

०२:१० – मुंबई महापालिकेचे आयुक्त घटनास्थळी दाखल, मृतांची संख्या १२ वर

०१:५४ – मृतांची संख्या ११ वर, तर २१ जण जखमी

०१:३९ – ढिगाऱ्याखाली अडकलंय २० दिवसांचे बाळ; एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

०१:१६ – एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत एकूण २१ जणांना यशस्वीपणे ढिगाऱ्याबाहेर काढले

१२:४२ – मृतांचा आकडा १०वर तर जखमींचा आकडा १४वर

१२:२५ – ढिगाऱ्याखाली ६० ते ६५ जण अडकल्याची भीती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे

११:४७ – सात जणांचा मृत्यू, युद्धपातळीवर सुरु आहे बचाव कार्य

११:२७ – पालकमंत्री सुभाष देसाई घटनास्थळी दाखल

११:०४ – दूर्घटनेतील मृतांची संख्या चार वर तर जखमींचा आकडा १३वर, जखमींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु

१०:२९ – मृतांचा आकडा तीनवर, ढिगाऱ्याखालून एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला

१०:१७ – घटनास्थळावरून बाचवक कार्याची क्षणचित्रे

१०:०५ – एनडीआरएफच्या ४५ जणांच्या तुकडीबरोबरच अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु असलेल्या बचावकार्याला वेग

९:५६ – जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, चार जणांवर उपचार सुरु

९:५३ – कोसळलेल्या इमारतीमध्ये १२ खोल्या आणि ६ गोडाऊन असल्याची स्थानिकांची माहिती

९:४८ – ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींवर जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

९:४४ – मुंबई: कोसळलेल्या इमारतीच्या शेजारील काही इमारतीही रिकाम्या केल्या

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai building collapsed near jj junction in pakmodia street people feared trapped rescue operation begins