केवळ पर्यटन परवान्याच्या जोरावर रस्त्यावर धावत असलेल्या ‘अ‍ॅप’आधरित टॅक्सीविरोधात काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा फटका मंगळवारी शहरात विशेषत: दक्षिण मुंबईच्या काही भागांत प्रवाशांना बसला. तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली असतानाच झालेल्या या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
अ‍ॅप आधारित टॅक्सी कंपन्यांना राज्य सरकारकडून सूट दिली जात असल्याचा आरोप करत टॅक्सीचालकांनी आंदोलन केले. यात दक्षिण मुंबईतील सुमारे ४०० ते ५०० टॅक्सीचालक सहभागी झाले. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चर्चगेट, मंत्रालय ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, ग्रँट रोड रेल्वे स्थानक ते पायधुनी, चर्चगेट रेल्वे स्थानक ते मंत्रालय या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. यात बसगाडय़ांनाही गर्दी झाल्याने अनेक प्रवाशांनी पायी कार्यालयाचा मार्ग स्वीकारला.
माध्यमांच्या गाडय़ा फोडल्या
दुपारपासून आंदोलकांनी आझाद मैदानात जमा होण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार सर्व आंदोलकांनी नियमांचे पालन केले. परंतु परत जात असलेल्या आंदोलकांमधील सात ते आठ जणांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयाजवळ एक ओला टॅक्सी पाहिली. आंदोलकांनी या टॅक्सीला थांबवत त्याची काच फोडली. तर तिच्यामागून जात असलेल्या दोन प्रसारमाध्यमांच्या गाडय़ांच्या काचाही या जमावाने फोडल्या. या घटनेत दोन गाडय़ांचे नुकसान झाले. आझाद मैदानाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी धाव घेत, सात आंदोलकांना ताब्यात घेत अटक केले. सातही जणांवर दंगल माजविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिराज वारिस (३०), रामचंद्र राय (३३), अब्दुल वहाब शेख (३०), अजय जैस्वाल (३०), अनिलकुमार गौर (३४), परमेश्वर जाधव (३०) आणि इम्तियाज खान (४३) या सात जणांना अटक केली.