मुंबई : ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली  वातानुकूलित ‘वंदे भारत एक्सप्रेस’ पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल-गांधीनगर-मुंबई सेन्ट्रल दरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानकात उद्या, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता या गाडीला हिरवा कंदिल दाखवणार आहेत. ही एक्सप्रेस १ ऑक्टोबरपासून नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. सहा तास २० मिनिटांत मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर कॅपिटल स्थानक प्रवास पूर्ण होणार आहे.

संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या एक्सप्रेसमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोटॉयलेट अशा विविध सुविधा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर अहमदाबाद येथून दुपारी दोन वाजता ती सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी ७.३५ वाजता मुंबई सेन्ट्रल टर्मिनसला पोहोचणार आहे. ही एक्सप्रेस १ ऑक्टोबरपासून नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत येईल. रविवार वगळता उर्वरित सहा दिवस ही गाडी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे.