गेल्या काही दिवसांपासून मुंबईत करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याची दिलासादायक माहिती समोर आहे. पुढील काही दिवसांमध्ये ती आणखी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर अशीच संख्या कमी होत राहिली तर नक्कीच करोनावर आपण नियंत्रण मिळवल्याचं म्हणता येईल. मुंबईची सद्यस्थिती पाहता हर्ड इम्युनिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल ५७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे.

निती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्यावतीने आर उत्तर (दहिसर), एम पश्चिम (चेंबूर)आणि एफ उत्तर (माटुंगा) या भागांत जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये रॅन्डमली पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आलं. दरम्यान, या तीन विभागांतील ६ हजार ९३६ जणांचे रक्ताचे नमुने घेण्यातआले. तसंच झोपडपट्टीतील निर्धारित लक्ष्यापैकी अधिक तर बिगरझोपडपट्टी भागांतील ७० टक्के रहिवाशी सहभागी झाले होते. त्यातील झोपडपट्टीतील ५७ टक्के तर बिगरझोपडपट्टी भागांतील १६ टक्के रहिवाशांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याची माहिती समोर आली.

म्हणजेच इतके रहिवाशी करोनामुक्त झाले असून, यांच्यातील बहुतांश जणांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, तर काही जणांना सौम्य लक्षणे होती. त्यात विशेषत: महिलांचे प्रमाण अधिक असल्याची नोंदही या अहवलात करण्यात आली आहे. दरम्यान, या तिन्ही विभागांमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचंही आढळलं आहे.

पहिल्या टप्प्यातील हे सर्वेक्षण हर्ड इम्युनिटीच्या अभ्यासासाठी पूरक ठरणार आहे. मात्र, हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी किती प्रमाणात अॅन्टिबॉडीज सापडल्या पाहिजेत हे अद्याप अनिश्चित आहे. दरम्यान, मोठ्या लोकसंख्येत अॅन्टिबॉडीजचे प्रमाण टिकून राहिले तर मुंबईची हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते, असंही सर्वेक्षणाच्या अहवालातून सांगण्यात आलं आहे. सेरो सर्वेक्षणाची पहिली फेरी पूर्ण झाली असून दुसरी फेरी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य

करोनाचा वेग कमी करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणे या उपाययोजना आवश्यक आहे. न्यू नॉर्मल हॅबीट म्हणून स्वीकारल्या गेल्या पाहिजेत, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.