मुंबईतील विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) बडतर्फ पोलीस अधिक रियाजुद्दीन काझीचा जामीन नाकारला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ एका वाहनात स्फोटके सापडल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येतील कथित भूमिका याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रियाजुद्दीन काझीला गेल्या वर्षी अटक केली होती. विशेष न्यायाधीश एटी वानखेडे यांनी काझीचा जामीन अर्ज फेटाळला.

मुख्य आरोपी सचिन वाझे सोबत काम करणारे रियाजुद्दीन काझी हे जेव्हा अंबानींचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाच्या बाहेर एका स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काड्या सापडल्या होत्या, तेव्हा मुंबई गुन्हे शाखेच्या एका युनिटमध्ये तैनात होते.

मागील वर्षी १३ मार्च रोजी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक वाझेला अटक केल्यानंतर या प्रकरणातील काझी यांची कथित भूमिका समोर आली होती. त्यांच्यावर खटल्याशी संबंधित पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. काझी आणि वाझे यांच्याशिवाय या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि माजी पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि सुनील माने यांचा देखील समावेश आहे.