उल्हासनगरातील प्रसिद्ध वाईनशॉपवर गोळीबार केल्यानंतर कुख्यात गुंड सुरेश पुजारी आपल्याच टोळीवर नाराज होता. या हल्ल्यात कोणीच ठार किंवा जखमी न झाल्याने पुजारीने आपल्या टोळीला, या पुढे जो समोर येईल त्याच्या छातीवर गोळी मारा, तरच कामाचे पैसे मिळतील, अन्यथा मला पैशांसाठी फोन करू नका, असा दम भरला. त्यानुसार गेल्या आठवडय़ात पुजारी टोळीने नालासोपारा येथील गॅलेक्सी हॉटेलमध्ये केलेल्या गोळीबारात कॅशिअरला लक्ष्य केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या कॅशिअरची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्यक्षात उल्हासनगर व आसपासच्या परिसरात खंडणीसाठी दिलेल्या धमक्यांना कोणीच भीक न घातल्याने पुजारी प्रचंड अस्वस्थ आहे. याच अवस्थेतून त्याने हे दोन हल्ले घडवून परिसरात दहशत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या तपासातून समोर येते आहे.

खंडणीविरोधी पथकाने पुजारीचा समन्वयक सुधाकर ख्रिस्तोप्रिया, उल्हासनगर व नालसोपाऱ्यात गोळीबार करणारे राजू चौहान, अली अब्बास खान अशा तिघांना शुक्रवारी कुल्र्यातून अटक केली. नालासोपाऱ्यातील हॉटेलमध्ये गोळीबार करण्याचे पुजारी या तिघांना दहा लाख रुपये देणार होता. त्यांच्याकडून पिस्तूल, दोन मॅगझिन, आठ काडतुसे, रोख अडीच लाख रुपये, दोन मोबाइल फोन आणि दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.