नवाब मलिकांचं समीर वानखेडेंच्या वडिलांना जाहीर आव्हान, म्हणाले, “तुम्ही कोर्टात जाऊन…”

मी कधीही धर्माच्या नावावर राजकारण नाही केले हे लोकांनाही माहिती आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

Mumbai drugs case Aryan khan ncb sameer wankhede Nawab Malik claims that the tweeted certificate is true

आर्यन खान प्रकरणात प्रकरणाला आता वेगळं वळण मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सोमवारी आणखी काही आरोप केले. वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे दर्शवणारी दाखल्याची प्रतच मलिक यांनी सादर केली. समीर यांचे आई-वडिल मुस्लीम होते मग त्यांनी राखीव कोटय़ातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळविला, असा सवालही मलिक यांनी केला. मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची छायाचित्रेही प्रसारित केली. त्यानंतर आता पुन्हा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत.

“मी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. माझी लढाई एनसीबीसोबत नाही. गेल्या ३५ वर्षात एनसीबीने खूप चांगले काम केले आहे. याआधी कोणीही एनसीबीच्या कामावर शंका उपस्थित केलेली नाही. पण एक व्यक्ती फसवणूक करून सरकारी नोकरी मिळवतो आणि जेव्हा मी या गोष्टी समोर आणल्या तेव्हा नवाब मलिक अधिकाऱ्याच्या खाजगी आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या भाष्य करत आहे असे म्हटले जाते. त्यांच्या कुटुंबातील लोकांना यामध्ये खेचले जात आहे असे म्हटले जात आहे. मी कोणाविषयी असा काहीही प्रकार केलेला नाही. काल जे जन्म प्रमाणपत्र ट्विटरवर शेअर केले होते त्यावरून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मी हिंदू मुस्लिम म्हणून हे प्रकरण पुढे आणत नव्हतो. भाजपाने या प्रकरणात धर्मावरून प्रश्न उपस्थित केले. मी कधीही धर्माच्या नावावर राजकारण नाही केले हे लोकांनाही माहिती आहे,” असे नवाब मलिक म्हणाले.

“जी व्यक्ती बोगस जन्मप्रमाणपत्र आणि कागदपत्रे तयार करुन अनुसूचित जातीच्या माध्यमातून नोकरी मिळवतो याबाबत मी प्रश्न उपस्थित केला आहे. कुठेतरी अनुसूचित जातीच्या एखाद्याचा या बोगस प्रमाणपत्रामुळे अधिकार हिरावून घेण्यात आला. या लढाईला मी पुढे घेऊन जाणार आहे. मी माझ्या दाव्यावर कायम आहे. मी जे प्रमाणपत्र ट्विट केले आहे ते खरे आहे. त्याच्यावर समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. समीर वानखेडेंच्या बहिणीचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध आहे. दीड महिन्यांच्या शोधानंतर हे प्रमाणपत्र आम्हाला मिळाले. समीर वानखेडेंच्या वडिलांनी वाशिम येथून प्रमाणपत्र मिळवले. त्यानंतर त्यांनी मुंबईत नोकरीला असताना जाहिदा खान यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर वडिलांच्या प्रमाणपत्राच्या आधारे आपले प्रमाणपत्र बनवले जे बोगस आहे. या प्रमाणपत्रावरुन काही जण तक्रार देखील दाखल करणार आहेत. फसवणूक करुन समीर वानखेडेंनी नोकरी मिळवली हे सिद्ध झाल्यानंतर सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. मला आशा आहे की सत्य समोर येईल. ज्यांचा हक्क त्यांनी हिरावून घेतला तो त्यांना मिळेल,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

“आमचे लोक यासंदर्भात आणखी कागदपत्रे मिळत आहेत आणि लवकरच हे प्रकरण वैधता समिती समोर जाईल. मला एनसीबीच्या अधिकाऱ्याने एक पत्र पाठवले आहे. हेच पत्र मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले आहे. हे पत्र एनसीबीच्या महासंचालकांना पाठवण्यात येणार आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

“मी कुणाचाही धर्म काढत नाही. माझा लढा हा एका मागासवर्गीयाचा अधिकार हिरावून बोगस कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणाऱ्याच्या विरोधात आहे. या प्रकरणामध्ये समीर वानखेडेंचे वडील सांगत आहेत की मी कधी धर्मपरिवर्तन केले नाही. मग खरे जन्म प्रमाणपत्र तुम्ही आणा आणि सांगा मी दिलेले प्रमाणपत्र खोटे आहे. माझ्याकडे बरीच कागदपत्रे आहेत. माझ्याकडे असे पुरावे आहेत जे ते कधीही नाकारू शकत नाहीत,” असे नवाब मलिक म्हणाले.

“समीर वानखेडेंच्या वडिलांनी दावा दाखल करावा. ४९९, ५०० अंतर्गत त्यांना अधिकार आहे. अंधेरी किंवा कुर्ला कोर्टात जावं. मला आरोपी करावं. मी तिथे कायदेशीर लढाई लढत यांचा फर्जीवाडा समोर आणणार. मी दाऊद वानखेडे यांना आव्हान देतो की, माझ्याविरोधात ४९९, ५०० अंतर्गत तक्रार दाखल करा. मुलीनेही आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल कऱणार असल्याचं सांगितलं आहे. १०० कोटींची गोष्ट करु नका, त्यासाठी १० टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. तुमच्याकडे दोन नंबरचे १००० कोटी असतील पण स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी लागणारा कागद तुमच्याकडे नसेल. समीर दाऊद वानखेडे, दाऊद वानखेडे, यास्मिन वानखेडे यांनी दावा दाखल करा असं माझं आव्हान आहे,” असे मलिक म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai drugs case aryan khan ncb sameer wankhede nawab malik claims that the tweeted certificate is true abn

ताज्या बातम्या