मुंबई : अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी – शिवडी उन्नत रस्त्याच्या कामाअंतर्गत जूना प्रभादेवी पूल पाडून त्याजागी नवीन दुमजली पूल बांधण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सध्या प्रभादेवी परिसरात पायाभरणीचे काम सुरू केले आहे. या कामादरम्यान लगतच्या जीर्ण १०० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींना हादरे बसत असल्याची तक्रार रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या हादऱ्यांमुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण असून रहिवाशांनी गुरुवारी रस्त्यावर उतरून एमएमआरडीएविरोधात आंदोलन केले. अधिकाऱ्यांना जाब विचारत आवश्यक त्या उपाययोजना करा, अन्यथा समूह पुनर्विकास करा अशी मागणीही रहिवाशांनी केली. या मागण्या मान्य न झाल्यास काम बंद पाडण्याचा इशारा संतप्त रहिवाशांनी एमएमआरडीएला दिला.

वरळी-शिवडी उन्नत रस्ता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रभादेवी पूल ओलांडून पुढे जाणार आहे. प्रभादेवी पूल जुना आणि धोकादायक झाल्याने एमएमआरडीएने तो पाडून त्याच्या जागी नवीन दुमजली पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या जुन्या पुलाचे पाडकाम सुरू असून दुसरीकडे शिरोडकर मंडईसमोर दुमजली पुलासाठी पायाभरणीचे काम सुरू करण्यात आले.

मात्र या कामादरम्यान येथील समर्थ निवास आणि जिमी चेंबर्स इमारतींना मोठ्या प्रमाणावर हादरे बसत असल्याची माहिती समर्थ निवास सोसायटीचे सचिव श्रीराम पवार यांनी दिली. या हादऱ्यांची तीव्रता अधिक असून त्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर इमारतींना भेगा पडू लागल्या आहेत. या इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या असल्याने या हादऱ्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाल्याचेही पवार यांनी सांगितले.

इमारतींना बसणाऱ्या हादऱ्यांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता समर्थ निवास, जिमी चेंबर्ससह अन्य काही इमारतींतील रहिवासी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाबही विचारला. रहिवाशांची आक्रमक भूमिका पाहून अधिकाऱ्यांनी शुक्रवारी इमारतींची पाहणी करत यंत्राद्वारे काही तपासणी केली. पायाभरणी करताना अधिक काळजी घेतली जाईल, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल असे अधिकाऱ्यांनी रहिवाशांना आश्वासित केले. मात्र रहिवाशांचे समाधान झालेले नाही. आता रहिवाशांनी एमएमआरडीए आणि स्थानिक पोलिसांना पत्र पाठवले असून या कामामुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल या पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.