महर्षी कर्वे मार्ग, एस. व्ही. रोड, गोखले रोड, न्यू लिंक रोड, एल.बी.एस. मार्गाचा समावेश;बेस्ट थांब्याच्या दोन्ही बाजूला ५० मीटर परिसरात पार्किंगबंदी

वाहने व पादचाऱ्यांच्या रहदारीने कायम फुलून जाणारे महर्षी कर्वे मार्ग, एस. व्ही. रोड, गोखले रोड, न्यू लिंक रोड, एल.बी.एस. मार्ग या शहरातील महत्त्वाच्या मार्गावर वाहने उभी करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरील बेस्ट थांब्यांच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी ५० मीटर म्हणजे १०० मीटर परिसरात वाहने उभी करण्यास मनाई असेल. पहिल्या टप्प्यात या सर्व मार्गावरील मिळून १९ किलोमीटरचा भाग वाहनतळमुक्त करण्यात येईल. येत्या ३० ऑगस्टपासून या पाच रस्त्यांवर ‘पार्किंगमुक्ती’ची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू होईल.

मुंबई क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक सुरळीत, गतिमान व शिस्तबद्ध होण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमपणे चालविता यावी यासाठी महापालिकेने या सर्व रस्त्यांचा मिळून सुमारे १४ किमीचा भाग रस्त्याच्या दोन्ही बाजूने पार्किंगमुक्त करण्याचे ठरविले आहे. तसेच या मार्गावरील बेस्ट बस थांब्यांच्या दोन्ही बाजूला ५० मीटर यानुसार एकूण १०० मीटरच्या परिसरात ‘नो पार्किंग’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी संबंधित परिमंडळीय सहआयुक्त, उपायुक्त, विभागस्तरीय साहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत. आतापर्यंत बेस्ट बस थांब्यासमोरच वाहन उभे करण्यास मनाई केली जात होती. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पार्किंगमुक्तीच्या प्रयोगाची अंमलबजावणी केली जाईल.

जुलै २०१९ पासून महापालिकेच्या २६ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर अंतराच्या परिसरात ‘नो पार्किंग’ राबविण्याचा निर्णय घेत रस्त्यावर अनधिकृतपणे वाहन उभे करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर बेस्टची आगारे बसगाडय़ा व इतर वाहनांना वाहनतळ म्हणून खुली करण्यात आली. याचा पुढचा टप्पा म्हणून मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतुकीला गती मिळावी यासाठी या रस्त्यांचे काही भाग वाहनतळमुक्त करण्याचे पालिकेने ठरविले आहे.

बेस्ट बस थांब्यांच्या दोन्ही बाजूला पार्किंगबंदी

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील बेस्ट बस थांब्यांच्या बाजूला अनधिकृत पार्किंग होत असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे बेस्ट बस गाडय़ांना अडथळा होतो. तसेच प्रवाशांनाही त्रास होतो. हे लक्षात घेऊन बेस्ट बस थांब्यांच्या दोन्ही बाजूच्या टोकांपासून ५० मीटर; यानुसार दोन्ही बाजूचे मिळून १०० मीटपर्यंत पार्किंगबंदी लागू असेल.

या ठिकाणी पार्किंगला मज्जाव

* महर्षी कर्वे मार्ग – दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्टेशन ते ऑपेरा हाऊस या दरम्यानच्या सुमारे साडे तीन किलोमीटर अंतराच्या महर्षी कर्वे मार्गावर

* स्वामी विवेकानंद मार्ग – पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्गावर जुहू एअरपोर्ट ते ओशीवरा नदीपर्यंतच्या ६ किलोमीटरच्या अंतरापर्यंत.

न्यू लिंक रोड – पश्चिम उपनगरातील ‘न्यू लिंक रोड‘वर डी. एन. नगर मेट्रो स्टेशन ते ओशीवरा नदीपर्यंतच्या सुमारे २ किलोमीटरच्या अंतरावर.

* लाल बहादूर शास्त्री मार्ग – पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावर कल्पतरु ते निर्मल लाईफस्टाईल या दरम्यानच्या सुमारे दीड किलोमीटर अंतरावर.

* गोखले मार्ग – दक्षिण मुंबईतील दादर परिसरातील गोखले मार्गावर पोर्तुगिज चर्च ते एल. जे. जंक्शन दरम्यानच्या मार्गावर.

ज्या मार्गावर पार्किंगला मनाई करण्यात आली आहे तिथे लगतच्या परिसरात असणाऱ्या सशुल्क वाहनतळाबाबत माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत.