शक्ती मिलमधील सामूहिक बलात्काराच्या दोन घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात एकूण सात आरोपींचा समोवश असून एक फरारी आहे. या आरोपींनी चार तरुणींवर सामूहिक बलात्काराची कबुली दिली आहे. आरोपींची कार्यपद्धती आणि पाश्र्वभूमी पाहता त्यांनी यापेक्षाही अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली़
हे सगळे आरोपी बेरोजगार आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आहेत. याच परिसरातल्या झोपडपट्टीत ते राहतात. शक्ती मिलच्या निर्जन जागेत ते चरस पिण्यासाठी, जुगार खेळण्यासाठी आणि मद्यपान करण्यासाठी येत असत. तो त्यांचा अड्डा बनला होता. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी  अशा पद्धतीने एकूण चार तरुणींवर सामूहिक बलात्कार केल्याची कबुली दिली होती. सोमवारी भांडुप येथील टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील बलात्काराला योगायोगाने वाचा फुटली. तिने आपल्यावरही पाच तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. या वेळी आणि दोन तरुण त्यात सहभागी असल्याचे आढळले. म्हणजे सामूहिक बलात्कारात ७ तरुणांचा सहभाग होता, हे आता उघड झाले आहे.
मोहम्मद सलीम अन्सारी हा या टोळक्यातला सगळ्यात मोठा. तो २७ वर्षांचा. इतर दोन अल्पवयीन आणि इतर विशीच्या घरातले. एकदा एका वेश्येला त्यांनी येथे आणून तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. तेव्हापासून ते सामूहिक बलात्कारासाठी सावज शोधू लागले होते. सलीमने इतरांना सांगून ठेवले होते. ‘पटरी पे ध्यान रखना. कोई लडकी आई तो मुझे तुरंत बुलाना’ असे त्यांने सांगून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.