हार्बर रेल्वेवरील प्रवाशांचा खोळंबा सुरुच असून सोमवारी चेंबूर – गोवंडी दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पनवेलकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिराने सुरु होती.
चेंबूर – गोवंडी दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विस्कळीत झाली. पनवेलकडे जाणाऱ्या लोकल गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले. काही वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. अनेकांनी ट्विटरवरुन रोषही व्यक्त केला. ‘हार्बर रेल्वेच्या प्रवाशांनी रेल्वेत सुधारणा होत नाही तोपर्यंत करच भरु नये, अशा संतप्त प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिल्या. तर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी पश्चिम व मध्य रेल्वेप्रमाणेच हार्बर रेल्वेकडे लक्ष देऊन देखभाल- दुरुस्तीसाठी जादा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून हार्बर रेल्वे मार्गावर सावळा गोंधळ सुरु आहे. सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे प्रवाशांनी दोन वेळा रेल रोकोही केला. मात्र यानंतरही हार्बर रेल्वेवरील तांत्रिक बिघाडाचे सत्र थांबलेले नाही.